औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे भवितव्य टांगणीला

इंदापूर, दि.२ मे २०२० : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांतर्गत सर्व औद्योगिक आस्थापनांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या औद्योगिक उत्पादन ठप्प झाल्याने कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

इंदापुरातील लोणी देवकर औद्योगिक वसाहतींमध्ये हजारोंच्या संख्येने कंत्राटी कामगार काम करतात. त्यामुळे सध्या सुरू असलेली स्थिती अधिक काळापर्यंत सुरू राहिल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकूण औद्योगिक क्षेत्राला येणाऱ्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

इंदापूर तालुक्यात लोणी देवकर या प्रमुख औद्योगिक वसाहतींसह इतरही लहान औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये अनेक लघू, मध्यम प्रकल्पांसह काही मोठे प्रकल्पही आहेत. दरम्यान, अनेक लघु व मध्यम प्रकल्पांची संख्या अधिक असल्याने यात काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः अनेक कारखान्यांमध्ये कंत्राटी स्वरुपाचे कामगार हजारोंच्या संख्येने आहेत. कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील कारखाने १७ मेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतके दिवस उत्पादन व इतर कामे बंद राहणार असल्याने विशेषतः कंत्राटी कामगारांना आठवड्याच्या आठवड्याला मिळणारे वेतन व इतर भत्ते बंद झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

राज्यातील ही स्थिती बघता राज्यसरकारने सर्व औद्योगिक आस्थापनांच्या व्यवस्थापनाला या काळात कामगारांना किमान वेतन लागू करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
मात्र, एकीकडे व्यवसाय बंद असल्याने व ही परिस्थिती आणखी पुढे सुरू राहिली तर संबंधित आस्थापना किती दिवस हे करू शकतात, असे अनेक प्रश्न पुढे निर्माण होण्याची शक्यता आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा प्रश्न हा सर्वाधिक प्राथमिकतेचा आहे. दुसरीकडे मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. त्यामुळे या काळात अनेक कर व इतर महत्त्वाची कामे असतात.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्वच ठप्प असल्याने सरकारनेही उद्योगांना या सर्व बाबींच्या मुदती वाढवून देण्यात याव्या आणि सततच्या बंदमुळे उद्योगांचेही मोठे नुकसान झाले आहे, हे गृहीत धरावे अशी अपेक्षा असल्याचेही मत उद्योजक व्यक्त करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा