पुणे;12 फेब्रुवारी 2022: वेस्ट इंडिज सध्या भारत दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यानंतर टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळणं अपेक्षित आहे.
कोरोनामुळं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता तिसरा सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे.
बंगाल असोसिएशनची बीसीसीआयकडं मागणी
यानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर उभय संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. तिन्ही सामने 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला कोरोनामुळं रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जातील. या संदर्भात, आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडं (BCCI) टी-20 मालिकेत चाहत्यांच्या प्रवेशास मान्यता देण्याची मागणी केली आहे.
आता बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा
CAB ने आपल्या निवेदनात म्हटलंय की, सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत भारत आणि वेस्ट इंडिजच्या T20 मालिकेवरही चर्चा झाली. यामध्ये सर्व सदस्यांना सांगण्यात आलं की सीएबीने बीसीसीआयकडं मालिकेदरम्यान चाहत्यांना ईडन गार्डन्समध्ये प्रवेश देण्याची मागणी केली आहे. आता बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. CAB ला पूर्ण आशा आहे की निकाल सकारात्मक येईल.
T20 मालिकेसाठी दोन्ही संघ
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेट कीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
वेस्ट इंडिज संघ : किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, ओडियन स्मिथ , रोमारियो शेफर्ड , काइल मेयर्स, हेडन वॉल्श जूनियर.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे