पुण्यातील सिंहगड रोडवरील पाटील रुग्णालयाचा तळमजला पाण्याखाली

पुणे, १५ ऑक्टोंबर २०२०: काल पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. शहरातील अनेक भागांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये व सोसायटीमध्ये देखील पाण्याचा शिरकाव झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील संभाव्य धोका पाहता याआधीच प्रशासनाला सर्व आपत्कालीन व्यवस्था करून ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान काल मुसळधार पावसामध्ये सिंहगड रोड परिसरातील पाटील हॉस्पिटलमध्ये पाणी घुसलं आहे.

हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर सर्वत्र पाणी आणि चिखल झाला आहे. हॉस्पिटल मध्ये पाण्याचा शिरकाव झाल्यामुळं अनेक उपकरणांमध्ये देखील बिघाड निर्माण झाला आहे. हॉस्पिटलमधील एक्सरे मशीन, सोनाग्राफी मशीन खराब झाली आहेत. पावसाचा जोर पाहता खालच्या मजल्यावरील सर्व रुग्णांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून वरच्या मजल्यावर हलवण्यात आला आहे.

दरम्यान शहरातील बहुतेक भाग हा पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. रात्रभर संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर ओसरत असला तरी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यात आज पुन्हा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा