आपल्याकडे एक म्हण आहे, ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी. याचा अर्थ ज्याने मदत केली, त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगावी; परंतु अलिकडच्या काळात मदत करणाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रघात पडला आहे. ‘ज्याचे खावे मीठ, त्याला *** लावावा नीट’ अशी नवी म्हण आचरणात आणली जात आहे. बांगला देश हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. ज्या देशाच्या मदतीने जगाच्या नकाशावर आपला उदय झाला, ज्या देशाच्या मदतीने कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला, त्याच देशाविरोधात कुरघोड्या करायच्या, असे बांगला देशाचे सध्याचे वर्तन आहे.
‘आयसीसी टी२०’ विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी बांगला देशने भारतात येण्यास नकार दिल्याने निर्माण झालेला वाद वाढतच चालला आहे. ‘बांगला देश क्रिकेट बोर्डा’ने आता या प्रकरणाला ‘राष्ट्रीय ओळखी’शी जोडले आहे. जर सामने भारतात खेळवण्यास भाग पाडले गेले, तर ते विश्वचषक बहिष्कार टाकू शकतात असे संकेत दिले आहेत. तथापि, या घोषणेच्या वेळी बांगला देश सरकारच्या क्रीडा सल्लागाराची उपस्थिती दर्शवते, की ‘बीसीबी’ने सरकारी दबावाखाली हा निर्णय घेतला आहे. बांगला देशाने ‘आयसीसी’ला त्यांच्या आणि भारतामधील परिस्थिती भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणून पाहण्यास सांगितले आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचे सामने तिसऱ्या देशात आयोजित करण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही; परंतु बांगला देशच्या या भूमिकेमुळे हा मुद्दा आणखी वाढेल हे निश्चित आहे.
‘आयसीसी’च्या पत्रानंतर पुढील पावले उचलण्यासाठी बैठक झाली. त्यात जागतिक क्रिकेट संघटनेने बांगला देशची भारताकडून श्रीलंकेत सामने हलविण्याची मागणी फेटाळली. ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) मधून बांगला देशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला हद्दपार केल्यापासून आसिफ नजरुल भारताविरुद्ध आक्रमक विधाने करत आहेत. बैठकीनंतर ‘बीसीबी’च्या पत्रकार परिषदेत त्यांची उपस्थिती क्रिकेट बोर्डावरील राजकीय दबाव स्पष्टपणे दर्शवते. बैठकीनंतर, आसिफ नझरुल यांनी ‘आयसीसी’च्या निर्णयावर ‘बीसीबी’ची भूमिका माध्यमांसमोर मांडली. बांगला देशने कठोर परिश्रम करून टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. आम्ही एक क्रिकेटवेडा देश आहोत आणि निश्चितच आम्हाला त्यात खेळायचे आहे; पण आम्हाला राष्ट्रीय अपमान, आमच्या क्रिकेटपटू, प्रेक्षक आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेची किंवा आमच्या राष्ट्रीय अभिमानाची किंमत देऊन विश्वचषक खेळायचा नाही, असे स्पष्ट करताना त्यांनी भारताऐवजी श्रीलंकेत क्रिकेट सामने ठेवण्याची मागणी केली.
बांगला देशची सुरक्षा, सन्मान आणि ओळखीचा प्रश्न आहे, तिथे कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर ‘आयसीसी’ने बांगला देशला मोठा धक्का दिला. सामना भारतातून हलवण्याची मागणी फेटाळली. त्यावर नझरूल यांनी ‘आयसीसी’ वरच टीका केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला परिस्थितीचे गांभीर्य समजले नसेल, असे अकलेचे तारे त्यांनी तोडले.
आयसीसीने पत्राला दिलेला प्रतिसाद वाचल्यानंतर असे दिसते, की त्यांना सुरक्षेच्या परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे समजलेले नाही. ‘आयसीसी’ला हे समजलेले दिसत नाही, की भारतातील सध्याची परिस्थिती बांगला देशी क्रिकेटपटूंसाठी सुरक्षित नाही. माझ्या मते, हा केवळ राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नाही. हा देशाचा अपमान आहे. जेव्हा भारतीय क्रिकेट बोर्ड स्वतः एका संघाला सांगत आहे, की ते मुस्तफिजुर रहमानला सुरक्षा देऊ शकत नाहीत आणि त्याला वगळण्यास सांगत आहेत, तेव्हा हे समजले पाहिजे, की भारतात खेळण्यासाठी सुरक्षित वातावरण नाही, असे ते म्हणाले. बांगला देश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनीही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला. ते म्हणाले, की सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला गेला नाही आणि पाकिस्तान गेल्या महिला विश्वचषकात खेळण्यासाठी भारतात आला नव्हता. सुरक्षा चिंता हे मूळ कारण आहे, म्हणून आम्हाला आशा आहे, की आमच्या मुद्द्याला ‘आयसीसी’कडून योग्य प्रतिसाद मिळेल. आमच्या सामन्यांसाठीही अशीच व्यवस्था करावी.
नझरुल यांनी लवकरच संपूर्ण प्रकरणाचे स्पष्टीकरण देणारे पत्र ‘आयसीसी’ला पाठवण्याचे जाहीर केले. ‘आयसीसी’चा प्रतिसाद मिळाल्यानंतर, बांगला देश विश्वचषकात खेळायचे, की नाही याचा निर्णय घेईल. मुस्तफिजूर रहमानला ‘आयपीएल’मधून काढून टाकण्यात आल्यापासून भारत आणि बांगला देशमधील हा संपूर्ण मुद्दा तापला आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. यानंतर, बांगला देश सरकारनेही देशात ‘आयपीएल’च्या प्रसारणावर बंदी घातली आहे. ‘आयसीसी’विरुद्ध खटला दाखल केला आहे. २०२६ चा टी-२० विश्वचषक सात फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
आयसीसी’ आणि सह-यजमान भारताने इतक्या कमी वेळेत सर्व व्यवस्था करण्यात अडचण येत असल्याचे कारण देत बांगला देशची विनंती नाकारली आहे. भारत आणि बांगला देशमधील क्रिकेट संबंधांमध्ये अचानक निर्माण झालेल्या कटुतेमुळे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या ‘आयसीसी पुरुष टी२०’ विश्वचषकाबाबत बांगला देश क्रिकेट बोर्डाची (बीसीबी) भूमिका केवळ धक्कादायकच नाही, तर प्रश्न उपस्थित करते. ‘बीसीबी’ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वर्षानुवर्षे केलेली मदत आणि पाठिंबा विसरली आहे का? मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात बांगला देशमध्ये अल्पसंख्याकांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे बांगला देशी खेळाडूंना ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) मध्ये खेळण्याची परवानगी देण्याच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. निषेधाच्या लाटेनंतर बोर्डाला हा निर्णय घ्यावा लागला. ‘बीसीसीआय’च्या या कडक कारवाईनंतर ‘बीसीबी’ आता आपला राग व्यक्त करत आहे. अत्यंत आक्रमक भूमिका घेत ‘बीसीबी’ने म्हटले आहे, की ते आता फक्त ‘आयसीसी’शी या विषयावर चर्चा करेल आणि ‘बीसीसीआय’शी कोणतीही चर्चा करणार नाही.
‘बीसीबी’ने त्यांचा संघ भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. बांगला देशने टी-२० विश्वचषकाच्या ठिकाणी बदल करण्याची विनंती करणारे पत्र ‘आयसीसी’ला पाठवले होते; परंतु क्रिकेटच्या प्रशासकीय मंडळाने सुरक्षा चिंता निराधार असल्याचे सांगून ‘बीसीबी’ची मागणी फेटाळून लावली, तरीही ‘बीसीबी’ सहमत राहिले नाही आणि त्यांनी आणखी एक औपचारिक पत्र पाठवले. दरम्यान, बांगला देशमध्ये आता ‘आयपीएल’चे प्रसारण बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयावरून स्पष्ट होते, की बांगला देश क्रिकेट बोर्ड ‘बीसीसीआय’च्या निर्णयावर खूप नाराज आहे आणि थेट संघर्षाचा दृष्टिकोन स्वीकारत आहे. बांगला देश संघ ‘बीसीसीआय’चा उपकार विसरला आहे. सध्या बांगला देशाच्या क्रिकेट क्रमवारीत ‘बीसीसीआय’ महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि, ‘बीसीबी’ आता ‘बीसीसीआय’ला आव्हान देत आहे. १९९८ मध्ये तत्कालीन ‘आयसीसी’ अध्यक्ष आणि ‘बीसीसीआय’चे माजी प्रमुख जगमोहन दालमिया यांनी बांगला देशमध्ये ‘आयसीसी’ नॉकआउट स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी बांगला देश ‘आयसीसी’चा पूर्ण सदस्यही नव्हता, म्हणून त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची कामगिरी होती. ढाका येथील या कार्यक्रमाने बांगला देशला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळख मिळवून दिली. बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियमवर एका मोठ्या ‘आयसीसी’ स्पर्धेचे आयोजन करणे ही त्यावेळी बांगला देशसाठी एक स्वप्नवत कामगिरी होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९८ मध्ये झालेल्या त्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने विजेतेपद जिंकले आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा चार गडी राखून पराभव केला.
कसोटी क्रिकेटमध्ये बांगला देशचा प्रवेशही सहजासहजी झाला नाही. ‘बीसीसीआय’चा भक्कम पाठिंबा या कामगिरीत महत्त्वाचा घटक होता. बांगला देश १९७७ मध्ये ‘आयसीसी’चा सहयोगी सदस्य बनला; परंतु कसोटी दर्जा मिळविण्यासाठी जवळजवळ २३ वर्षे लागली. १९९९ मध्ये, पहिला विश्वचषक खेळणाऱ्या बांगला देश संघाने स्कॉटलंडला हरवले आणि नंतर पाकिस्तानला धक्कादायक पराभव पत्करला. या विजयांनी ‘आयसीसी’समोर आपला दावा मजबूत केला. भारतासोबतच, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनीही बांगला देशला पाठिंबा दिला, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया स्पष्टपणे त्याच्या विरोधात होते. अखेर जून २००० मध्ये ‘आयसीसी’ने बांगला देशला एकमताने कसोटी दर्जा दिला, हा दर्जा जगभरातील अनेक क्रिकेट मंडळे दशकांपासून मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. नोव्हेंबर २००० मध्ये, बांगला देशने ढाका येथील बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियमवर भारताविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला. हा सामना बांगला देशच्या क्रिकेट इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता आणि योगायोगाने, तो भारताचा नवा कर्णधार सौरव गांगुलीचाही पहिला सामना होता. त्या सामन्यादरम्यान, बांगला देशने पहिल्या डावात चारशे धावा करून शानदार सुरुवात केली, तथापि, अनुभवी भारतीय संघाने हा सामना ९ विकेट्सने जिंकला. बांगला देशच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीची पहिली काही वर्षे कठीण होती, संघाला वारंवार पराभवांचा सामना करावा लागला. तथापि, २००५ मध्ये, त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध त्यांची पहिली कसोटी मालिका जिंकली. कसोटी दर्जा मिळाल्यानंतरही, भारताने बांगला देशच्या क्रिकेट विकासात मोठी भूमिका बजावली. असे असताना बांगला देशाने भारताविरोधात घेतलेल्या भूमिकेचा भारतातून निषेध होण्याऐवजी बांगला देशच उलट कांगावा करीत आहे.
– भागा वरखडे














































