गडचिरोलीतील हत्ती स्थलांतरप्रकरणी उच्च न्यायालयाने स्वत:हून दाखल करून घेतली याचिका

नागपूर, ९ सप्टेंबर २०२२ :जंगलातील हत्तींना प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्याबाबत वन खात्याने उचललेले पाऊल हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या विरोधात आहे, असे न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांवरून नागपूर उच्च न्यायालयाने, गडचिरोली जिल्ह्यातील पातानील येथील हत्ती कॅम्पमधील हत्ती, गुजरातच्या प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्यावरून स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे.

याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, राज्याचे मुख्य सचिव, महसूल व वन खात्याचे प्रधान सचिव, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव, राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष व केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अध्यक्षांना प्रतिवादी केले असून त्यांना उत्तर सादर करण्यास नोटीस दिली.

जंगली हत्तींनी अधिवासा साठी पातानील जंगलाची निवड केली आहे. तो त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे व अनेक वर्षांपासून ते येथे राहत आहेत. गडचिरोलीच्या जंगलात इतर जंगलातून हत्ती येतात यावरून पातानील हा परिसर हत्तींसाठी आवडता अधिवास असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कमलापूर ग्रामपंचायतीने हत्ती न हलवण्याबाबत ठराव केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत, वन्यप्राण्यांच्या हक्काच्या विरोधात पावले उचलून हे स्थलांतर करण्यात येत आहे असा आरोप स्थानिक लोक करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा