तुळजाभवानीच्या सोने, चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला हायकोर्टाची स्थगिती, हिंदू जनजागरण समितीने केली होती जनहित याचिका

4

तुळजापूर ११ डिसेंबर २०२३ : आई तुळजाभवानीच्या दानपेटी मध्ये राज्यातील तसेच परराज्यातील व देशभरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सोने व चांदीचे दान केले होते. तब्बल तेरा वर्षानंतर या सोन्या-चांदीची मोजदात झाल्यानंतर 207 किलो सोने व 2570 किलो चांदी वितळवण्यास विधी व न्याय विभागाने परवानगी दिली होती. त्या परवानगीला तुळजापूर शहरातील काही पुजारी भाविक यांचा विरोध होता. या विरोधात हिंदू जनजागरण समितीने मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर येथे जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन न्यायाधीशांनी निर्णय दिला असून मंदिर संस्थानाकडून सोने, चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे.

आई तुळजाभवानीच्या दानपेटी मध्ये १ जानेवारी २००९ ते १० जून २०२३ यादरम्यान मोठ्या प्रमाणात सोने, चांदी भाविकांनी दान दिलेली होती. जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओंम्बासे यांनी या दान केलेल्या सोने, चांदीची मोजदाद करून दान आलेले सोने,चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला विधी व न्याय विभागाकडे परवानगी मागितली होती. विधी व न्याय विभागाने सोने-चांदीला वितळण्याच्या प्रक्रियेला परवानगी दिल्यानंतर सरकारने तसा अध्यादेशही काढला होता, याच अध्यादेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे हिंदू जनजागरण समितीने जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेला अनुसरून पुढील सुनावणी होईपर्यंत सोने-चांदी वितळण्याची स्थगिती दिलेली आहे. पुढील सुनावणी नऊ जानेवारी २०२४ ला होणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा