मुंबई, ३० सप्टेंबर २०२२ : देशातील सर्वात उंच केबल पूल महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बांधण्यात येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत १३२ मीटर उंच पूलाचे बांधकाम सुरु आहे. यामध्ये ८२ मीटर उंचीचा सर्वात उंच पिलर असणार आहे. तर या केबल पूलाची लांबी ६५० मीटर असणार आहे.
आता अस्तित्वात असलेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचे खोपोली बाह्यवळण ते सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणा पर्यंतची लांबी सुमारे १९ किलोमीटर आहे. मिसिंग लिंक प्रकल्प मुळे खंडाळा घाट विभागाला बायपास केली जाईल त्यामुळे दृतगती मार्गाचे अंतर सहा किलोमीटर पेक्षा कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना सुमारे अर्ध्यातास प्रवासाचा वेळ कमी लागणार आहे. नव्याने होत असलेल्या पूलाचे बांधकाम पायाभूत क्षेत्रातील अफकॉन्स कंपनी कडून करण्यात येत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मिसिंग लिंक प्रकल्प दोन विभागात विभागलेला आहे.त्यापैकी अफकॉन्स कडून विभाग-दोन चे काम सुरू आहे. यामध्ये सध्याच्या द्रुतगती मार्गाचे सहा पदरीवरून आठ पदरी पर्यंत रुंदीकरण करणे, दोन उड्डाणपूलांचे बांधकाम, त्यामधील एक केबल पूल, व इतर कामांचा समावेश आहे. आताच्या ८५० मीटर लांबीच्या पूलाचे पायाभरणी चे काम पूर्ण झाले आहे. या केबल पूलाची लांबी ६५० मीटर एवढी आहे. हा पूल जमिनीपासून १३२ मीटर उंचीवर असणार आहे. नव्याने उभारण्यात येत असलेला हा पूल देशातील कोणत्याही महामार्ग प्रकल्पामधील सर्वात उंच राहणार आहे. या नव्या लिंकमुळे महामार्गावरील अपघात कमी होणे आणि दळणवळण जलद गतीने होण्यास मदत येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर