कोविड -१९ ची एकाच दिवसात देशातील आतापर्यंतची सर्वात विक्रमी वाढ

नवी दिल्ली, दि. ४ जुलै २०२० : कोविड -१९ चा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सरकार कडून सातत्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु कोविड -१९ चा प्रभाव काही कमी होताना दिसेना. यातच आता एका दिवसातील सर्वात विक्रमी वाढ काल नोंदवली गेली. गेल्या २४ तासात देशांमध्ये कोविड -१९ ची २२,७७१ नवे प्रकरण समोर आली आहेत.

गेल्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रात ६३२८, तमिळनाडूमध्ये ४३४३, दिल्ली २३७३ रुग्णांची वाढ झाली. दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या ९० हजारांहून अधिक झाली असून ती ९२ हजार १७५ वर पोहोचली आहे. राजधानीतील रुग्ण वाढ लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. दिल्लीत रक्तद्रव बँकही सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६,४८,३१५ इतकी झाली आहे. यापैकी दोन लाख ३५ हजार ४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर तीन लाख ९४ हजार २२७ जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४२ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत देशभरात १८, ६५५ लोकांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६०.७२ टक्के झाले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात करोना रुग्णांची संख्या अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा १.५ लाखांनी जास्त आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २ लाख ४२ हजार ५७६ नमुना चाचण्या झाल्या असून एकूण ९५ लाख ४० हजार ७४९ चाचण्या करण्यात आल्या.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा