मुंबई २७ जून २०२३: आयसीसी ने क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही, भारतात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. २०११ नंतर भारत प्रथमच या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीकडे पाठवले होते. या वेळापत्रकानुसार, ५ ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होईल आणि अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.
विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. त्याचबरोबर यजमान भारत ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळेल. विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे अनुक्रमे १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी होतील.
या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तानचा सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आयसीसीने आज अंतिम वेळापत्रक जाहीर केले असले तरी अजुन आयसीसीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड