शेअर बाजाराच्या घसरणीचा रुपयावर परिणाम, पोहोचला सर्वोच्च नीचांकी पातळीवर

मुंबई, 14 जून 2022: कालच्या ट्रेडिंग सत्रात रुपया सर्वोच्च नीचांकी पातळीवर घसरला. रुपया 36 पैशांनी घसरून 78.29 च्या सर्वोच्च नीचांकी पातळीवर पोहोचला. कमकुवत आशियाई चलने, देशांतर्गत इक्विटीमधील मंदीचा कल आणि सतत परकीय भांडवलाचा प्रवाह यामुळं गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाल्याचं विदेशी मुद्रा व्यापार्‍यांनी सांगितलं.

इंटरबँक फॉरेन एक्सचेन्ज मध्ये रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 78.20 वर उघडला त्यानंतर आपली नीचांकी पातळी गाठत तो 78.29 वर जाऊन पोहोचला. ही घसरण शेवटच्या क्लोजिंग नंतर 36 पैसे एवढी होती. शुक्रवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 19 पैशांनी घसरून 77.93 या नीचांकी पातळीवर बंद झाला होता.

फिनरेक्स ट्रेझरी अॅडव्हायझर्सचे ट्रेझरी प्रमुख अनिल कुमार भन्साळी म्हणाले की, कमकुवत जागतिक भावना आणि कमकुवत आशियाई आणि युरोपियन चलनांनी रुपया 78 च्या खाली उघडला. मात्र आरबीआयने असं सांगितलं होतं की, रुपया 77.70 च्या खाली जाणार नाही. आता यानंतर आरबीआयची यावर काय भूमिका असेल हे पाहणं आवश्यक आहे.

देशांतर्गत इक्विटी बाजारात, 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक 1,461.54 अंकांनी म्हणजेच 2.69 टक्क्यांनी घसरून 52,841.90 वर ट्रेडिंग करत होता, तर NSE निफ्टी निर्देशांक 418.95 अंक म्हणजेच 2.59 टक्क्यांनी घसरून 15,782.85 वर गेला.

विदेशी संस्थागत गुंतवणूकदार शुक्रवारी भांडवली बाजारात निव्वळ विक्रेते होते. कारण त्यांनी स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार 3,973.95 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा