

Reckless driving by Pune tourist in Alibag : पुण्यातील एका पर्यटक महिलेचा विचित्र करणामा समोर आला आहे. पर्यटक महिलेनी अलिबागमध्ये मध्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून स्थानिक वाहनांना धडक दिली आहे.याशिवाय त्यांनी पोलिस आणि स्थानिकांसोबत वाद देखील घातला. याप्रकरणी एका महिलेविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पर्यटक महिनेले कारने जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकांसह शहरातील काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर बेफिकीरीने वाहन चालवत त्यांनी रेवदंडा बायपासजवळ एका वाहनाला जोरदार धडक दिली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण घटनेमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. पण या घटनेमध्ये पर्यटक महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली. तेव्हा गाडीमध्ये काही दारूच्या बाटल्या त्यांना आढळून आल्या. मिना भोसले असे पर्यटक महिलेचे नाव असून त्या पुणे येथील रहिवाशी आहेत.पर्यटक महिलेसोबत तिच्यासोबत असणाऱ्या पुरुषाची देखील वैद्यकीय चाचणी करण्यात आली असल्याची माहिती अलिबागचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. दरम्यान सदर महिलेविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार मोतेरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर