दौंड, दि. ७ जुलै २०२०: दौंड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर कोरोनाच्या विळख्यात सापडले असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दौंड शहर पुन्हा चौदा दिवसासाठी बंद ठेवण्यात आले असून परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गावात देखील कडकडीत बंद पाळून कोरोनाचे संक्रमण रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
दौंड तालुक्यातील औद्योगीक क्षेत्रात कोरोनाच्या प्रभावाने अनेक उद्योगाच्या उत्पादन क्षमतेत कमालीची घट झाल्याचे आढळून येत आहे. तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधीत क्षेत्र ठरवून दिल्याने अनेक कामगारांना कामासाठी बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आल्याने व बाहेरील कामगारांना सध्या कंपनीत परवानगी नसल्याने औद्योगीक क्षेत्र प्रभावीत झालेले आहे. सुरक्षेच्या विविध उपाय योजना करुन सध्या कामगारांना आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत सावधगिरीने काम केले जात आहेत परिणामी लॉक डाऊनच्या शिथिलतेने बाधितांची संख्या वाढल्याचे आढळत आहे.
दरम्यान दौंड शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी शहर बंदला विरोध दर्शविला आहे. शहर बंद करताना अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक दुकाने उघडली जात असल्याने बंद मध्ये सहभागी होणाऱ्या इतर व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने बंद करताना सर्वांना सारखे नियम लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्या टोळक्यांना पोलीसांनी दंड ठोठावले असुन याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख