टोकियो, २ ऑगस्ट २०२१: भारतीय पुरुष हॉकी संघाने शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. टीम इंडियाने रविवारी खेळलेल्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा ३-१ असा पराभव केला. विजयाचा नायक होता भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेश, ज्याने चार उत्कृष्ट बचाव केले. भारतासाठी दिलप्रीत सिंगने ७ व्या मिनिटाला, गुरजंत सिंगने १६ व्या आणि हार्दिक सिंहने ५७ व्या मिनिटाला गोल केले. त्याचवेळी ग्रेट ब्रिटनसाठी गेमच्या ४५ व्या मिनिटाला सॅम वार्डने एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना जागतिक विजेता बेल्जियमशी मंगळवारी होईल.
भारताने ४९ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी म्युनिक ऑलिम्पिकमध्ये (१९७२) भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली होती. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते. पण त्या काळात भारताने सहा संघांच्या पूलमध्ये राऊंड रॉबिन आधारावर दुसऱ्या क्रमांकावर राहून अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते.
पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाचे पूर्ण वर्चस्व होते. ग्रेट ब्रिटनला तिसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, जो भारतीय बचावपटूंनी उधळून लावला. यानंतर ४५ व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगच्या पासवर दिलप्रीतने गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या मिनिटाला गुरजंत सिंगने मैदानी गोल करून भारताला २-० ने पुढे केले. मात्र, यानंतर भारत या क्वार्टरमध्ये गोल करू शकला नाही आणि हाफ टाईमपर्यंत तोच स्कोर राहिला.
ग्रेट ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टर मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. शेवटी, गेमच्या ४५ व्या मिनिटाला सॅम वार्डने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करून ग्रेट ब्रिटनचे खाते उघडले. ग्रेट ब्रिटनला चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्येही पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारतीय गोलरक्षक आणि बचावपटूंनी गोलची शक्यता दूर करण्यासाठी चमकदार कामगिरी केली. त्यानंतर खेळाच्या ५७ व्या मिनिटाला हार्दिक सिंहने शानदार मैदानी गोल करत भारताला ३-१ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली.
ऑलिम्पिकमध्ये भारताचे शेवटचे पदक १९८० मध्ये मॉस्को येथे होते, जेव्हा संघाने वासुदेवन भास्करनच्या नेतृत्वाखाली पदक जिंकले. तेव्हापासून, भारतीय हॉकी संघाची कामगिरी सातत्याने घसरत आहे आणि १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पाचव्या क्रमांकावर आल्यानंतर त्याला चांगले काम करता आले नाही. पण आता ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला पदक जिंकण्याची मोठी संधी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे