मुंबई, २३ मे २०२३: द केरला स्टोरी या चित्रपटाने नुकताच २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतानाच आता पश्चिम बंगाल मध्ये देखील केरला स्टोरी प्रदर्शित करण्यास परवानगी मिळाली आहे. पश्चिम बंगालमधील द केरळ स्टोरीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करूनही, चित्रपटगृह मालकांच्या लॉजिस्टिक अडचणींमुळे हा चित्रपट प्रदर्शित होत नव्हता. परंतु आता पश्चिम बंगालच्या बोनगावमधील एका सिंगल स्क्रीनने पुढे येत हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण पश्चिम बंगालमधील थिएटर आणि मल्टिप्लेक्स मालकांनी दोन आठवड्यांसाठी स्लॉट भरले आहेत, बुक केलेले स्लॉट रद्द करू शकणार नाही, अशी कारणे देत द केरला स्टोरीचे शो लावण्यास नकार दिला. तथापि, बोनगाव मधील एका सिंगल स्क्रीन ने मात्र चित्रपट दाखवायला सुरुवात केली आहे. या चित्रपटगृहात देखील प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी करत, शो हाउसफुल करून चित्रपटास पसंती दर्शवली आहे.द केरळ स्टोरी चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर बिशाख ज्योती हे बोनगावचे असल्याने बंदी हटवल्यानंतर बोनगावने पुढाकार घेत चित्रपटाचे पहिले स्क्रीनिंग केले आहे.
बिशाख ज्योतींनी व्यक्त केला आनंद:-
बिशाख म्हणाला की ,”मला आनंद आहे की पश्चिम बंगाल मध्ये देखील चित्रपटाला परवानगी मिळाली आहे. परंतु असे असतानाही, अनेक चित्रपट गृह चित्रपट प्रदर्शनास मान्यता देत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मला वाटते फक्त या एकाच चित्रपटगृहात नाही तर सिंगल-स्क्रीन थिएटरमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होऊ लागला आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच पश्चिम बंगालमधील आणखी अनेक चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित होईल.”
१८ मे रोजी सुप्रीम कोर्टात द केरळ स्टोरी या चित्रपटाला पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही, चित्रपट अजूनही राज्यातील चित्रपटगृहांमध्ये अनुपस्थित आहे. यावर राज्य सरकारचा निर्णय अजून बाकी आहे असेही उत्तर काही चित्रपटगृहांच्या मालकांनी दिले आहे. अनेक ठिकाणी विरोध होत असतानाही न्यायालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दाखवली आहे. चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केल्याने पश्चिम बंगालमध्ये ही लवकरच चित्रपटाला स्क्रीन मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे