बहुआयामी शाहिरांचा जीवनपट उलगडणार मराठी पडद्यावर

38

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२३ : ‘गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वतःची नवीन ओळख बनविली. महाराष्ट्रातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर मनापासून प्रेम केले आणि अभिमानाने हे गाणे गुणगुणले; परंतु या गाण्याची आपल्याला ओळख करून देणाऱ्या लोकशाहीर कृष्णराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकुश चौधरी हा शाहीर साबळे यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

लेखक व दिग्दर्शक केदार शिंदे यांची मोठी घोषणा-

केदार शिंदे दिग्दर्शित आणि संजय छाब्रिया व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर व चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे. “शाहीर साबळे म्हणजे महाराष्ट्राचे बाबा, त्यांच्यावरील प्रेमासाठी आणि श्रद्धेसाठी, व तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दर्जेदार आणि उत्तम देण्याची इच्छा या सगळ्यांमुळे हे शक्य झाले आहे,” असे म्हणत काही दिवसांपूर्वी या चित्रपटावर ३ वर्षे काम करीत असल्याचे एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितले होते.

https://www.instagram.com/reel/CorN8LFLjpF/?igshid=MDM4ZDc5MmU=

मराठी चित्रपटसृष्टीचा नवीन प्रयोग-

मराठी परंपरा, मराठी संस्कृती याचा इतिहास पाहायला गेलं तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार, प्रसार आणि जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा शोध लागला. त्यातीलच एक पद्धत म्हणजे शाहिरी कला. या कलेच्या माध्यमातून स्वातंत्र्यचळवळ, महाराष्ट्रातील लढे अनोख्या पद्धतीने लोकधारेच्या माध्यमातून शाहीर पोचवीत असतात. त्यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. तर या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांनी संगीत दिले आहे. त्याचप्रमाणे प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अंकुश चौधरीबरोबर अतुल काळे, सना केदार शिंदे, अमित डोलावत हे कलाकारही मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. असा शाहिरी कलेचा सन्मान करणारा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा