पंढरपूर, दि.२१ मे २०२०: लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात सोलापूर जिल्ह्यात दारू विक्रीस बंदी असतानाही पंढरपूर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या एका दुय्यम निरीक्षकाने (दारू बंदी अधिकारी) विदेशी दारुचा अवैध साठा करून त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कारवाईनंतर राज्यभरातील उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
वाखरी (ता. पंढरपूर) येथील ‘सारा इन’ या हॉटेलमध्ये अवैध दारूचा साठा करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे. या पोलिस कारवाईमध्ये १३ हजार ४३८ रुपये किंमतीचा विदेशी दारुचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यात दारु विक्रीस बंदी घातली आहे. अशा काळात दारूला मागणी वाढल्याने अनेक ठिकाणी दारूची चोरून विक्री केली जात आहे. चोरून दारु विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी उत्पादन शुल्क विभागात अधिकारी असलेले मिलिंद जगताप हेच चोरुन दारु विक्री करत असल्याची बाब पोलिस कारवाईनंतर समोर आली आहे.
या प्रकरणी पंढरपूर येथील उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मिलिंद जगताप आणि दारु साठ्याची देखरेख करणारा युवराज नेताजी पवार रा. ढोकबाभूळगाव, ता.मोहोळ, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: