खांडवी खून प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार

कर्जत, दि. ३० जून २०२० : खांडवी येथील काकासाहेब मच्छिंद्र तापकीर यांच्या कुटुंबीयांवर दिनांक २४ मे २०२० रोजी खुनी हल्ला झाला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेले काकासाहेब तापकीर २५ मे रोजी मयत झाले. कर्जत पोलिसांनी त्याच दिवशी रात्री अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला.

कर्जत पोलिसांनी या खुनी हल्ल्यातील ११ पैकी १० आरोपी अटक केले. मात्र मुख्य आरोपी प्रविण पोपट तापकीर हा गेल्या ३५ दिवसात पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो खांडवी परिसरातच असून, रात्रीच्या वेळी तो घरी येऊन जातो. त्याचे कोंभळी येथील नातेवाईक त्याला जेवण आणि रसद पुरवितात. अशी परिसरात चर्चा आहे. पण कर्जत पोलिसांना तो का सापडत नाही ? याचे गूढच आहे.

प्रविण पोपट तापकीर या मुख्य आरोपीस तात्काळ अटक करावी म्हणून,खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेला मयत काकासाहेब तापकीर यांचा बंधू धनंजय मच्छिंद्र तापकीर, त्याची आई श्रीमती पुष्पा मच्छिन्द्र तापकीर आणि मयत काकासाहेबांची पत्नी प्रतिक्षा हे तिघेजण शासकीय आदेश पाळून दि. २ जुलै २०२० पासून कर्जत पोलिस ठाण्यासमोर प्राणांतिक उपोषणाला बसणार आहेत. पोलिसांच्या शब्दावर गेली ३५ दिवस विश्वास ठेवूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या आश्वासनावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. म्हणून हे कुटुंबीय प्राणांतिक उपोषण करणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा