मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान उडवण्याची धमकी देणारा अखेर जेरबंद…

मुंबई, १२ सप्टेंबर २०२०:  काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकार मधील मोठ्या नेत्यांना धमकीचे फोन आले होते. यामध्ये खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकीचे फोन आले होते. दोन ते सहा सप्टेंबर या कालावधीत हे फोन आले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे भासवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी या फोन वरून दिली गेली होती. आज या धमकी देणाऱ्या व्यक्तीला अखेर अटक करण्यात आली आहे.
                                                                                                                                 मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कोलकात्यातून या व्यक्तीला अटक केली. ४९ वर्षीय आरोपी हा कोलकात्यातील टोलीगंज भागात राहणारा जिम प्रशिक्षक असल्याची माहिती आहे. या आरोपीचं नाव पलाश बोस असं आहे. तो काही वर्षांपूर्वही दुबईला गेला होता. दुबईत याचे काही धागेदोरे सापडतात का? याचा तपास करत असल्याची माहिती एटीएसने पत्रकार परिषदेत दिली. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नाही तसेच तो मानसिकदृष्ट्या व्यवस्थित आहे, असेही एटीएसने सांगितले.
                                                                                                                                 दुबईत कोणासोबत त्याचे संपर्क आहेत, त्याच्याकडे किती सिम कार्ड आहेत, कोणते अ‍ॅप आहेत, कोणत्या टीम किंवा गँगशी त्याचा संबंध आहे का, याबाबत चौकशी सुरु आहे. आतापर्यंतच्या तपासात त्याचा कोणताही रेकॉर्ड असल्याचं सापडलं नाही, असेही एटीएसने सांगितले.
                                                                                                                            सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाष्य करणारी अभिनेत्री कंगना रनौतपासून लांब राहण्याची धमकी त्याने दिली होती. संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले असता त्याने आपण कंगनाचा चाहता असल्याचे सांगितले होते. राऊत यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर कोलकात्यातील त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा