राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत ‘गोष्ट एका पैठणीची’ या मराठी चित्रपटाची भर

मुंबई, २ डिसेंबर २०२२ : शंतनू रोडे लिखित आणि दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत स्थान मिळाले आहे. प्रामाणिकपणे जीवन जगण्याची वृत्ती पैठणीच्या गोष्टीतून सांगणारा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. ‘हातात आली की काळजाला भिडते पैठणी…’, ‘माणसाने जेवढं शक्य आहे तेवढं तरी चांगलं वागलं पाहिजे’ अशा सोप्या लिखित वाक्यांमधून जीवनातील नीतिमूल्यांची सांगड घालणारी ही कथा मनात घर करते. ‌

कथा
ही कथा फिरते ती फुले विकणाऱ्या सुजित आणि घरीच साड्यांना फॉल बिडिंग करणाऱ्या इंद्रायणीच्या सभोवताली. ऐन दिवाळीत कामानिमित्त सायकलवरून बाहेर पडलेल्या सुजितचा अपघात झाल्याने उपचारांसाठी झालेला खर्च दोघांनाही त्रास देत असतो. सुजित घरूनच पुष्पगुच्छ बनवायला सुरवात करतो. तो रुग्णालयातून घरी येत असतानाच गावातील श्रीमंत स्मिताताई इंद्रायणीकडे काम घेऊन येतात. आणि तिथेच सव्वालाखाच्या पैठणीची कथा सुरू होते‌. याआधी मुलाला फटाके घेण्याची ऐपत नसते; परंतु त्यानंतर पैठणी कोणते रंग उधळते ते पाहायला मिळतं. मानवाच्या जन्माप्रमाणेच पैठणीच्या जन्माची एक अनोखी कहाणी या चित्रपटातून समोर आली आहे.

या चित्रपटातील अनेक संवाद जीवनासोबतच जगण्याचं सार सांगतात. तर या चित्रपटातील गाणी देखील श्रवणीय आहेत. चित्रपट मांडताना थोडा फापटपसारा झाला आहे; परंतु पैठणीच्या निमित्ताने किंवा फटाक्यांच्या ट्रॅकद्वारे वेगवेगळ्या गमतीशीर, प्रामाणिक अशा भावनांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, आरव शेट्टी, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता हनमघर, आदिती द्रविड, मोहन जोशी, शशांक केतकर, मधुरा वेलणकर-साटम, गिरिजा ओक, सविता मालपेकर, सुनीता थत्ते, जयंत वाडकर, पूर्णिमा अहिरे या कलाकारांनी अभिनय केला आहे‌. तर अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पीयुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा