शासन वारकर्यांना न्याय देत नाही तोपर्यंत मोर्चे सुरूच राहणार, विश्व वारकरी सेना मेळाव्यात निर्णय

पुरंदर, ११ डिसेंबर २०२०: महाराष्ट्राला साधू – संत, महंत आणि शूर वीर महापुरुषांचा इतिहास आहे. साधू संतानी हि भूमी निर्माण केली आणि संपूर्ण जगात वेगळी संस्कृती निर्माण केली. संपूर्ण जगात संत महात्म्यांना मान सन्मान आहे. परंतु ज्यांनी हि भूमी निर्माण केली त्या राज्यातच वारकरी समाज उपेक्षित आहे. या शासनाला मंदिरांपेक्षा मदिरालये जास्त महत्वाची वाटत आहेत. रस्त्या रस्त्यावर दारूची दुकाने सुरु आहेत. परंतु, मंदिरे मात्र अद्यापही बंद आहेत हि मोठी शोकांतिका आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असताना मंदिरे उघडण्यासाठी वारकर्यांना मोर्चे काढावे लागतात हे दुर्दैव आहे. त्यामुळे जो पर्यंत शासन वारकर्यांना न्याय देत नाही, तोपर्यंत मोर्चे सुरूच राहणार असा थेट इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक हभप अरुण महाराज बुरघाटे यांनी दिला आहे.

सासवड ( ता. पुरंदर ) येथील संत सोपानदेव मंदिरात पुरंदर तालुका विश्व वारकरी सेनेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना हभप अरुण बुरघाटे यांनी शासनावर तोफ डागली आहे. यावेळी विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप तुकाराम चवरे, युवाध्यक्ष हभप जगन्नाथ देशमुख, राष्ट्रीय सहसचिव हभप महादेव शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हभप भाऊसाहेब ढगे, उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, दौंड अध्यक्ष सोनबा कुदळे, उपाध्यक्ष लक्ष्मण टेमगिरे, युवाध्यक्ष सतीश टिळेकर, बारामती अध्यक्ष बाळासाहेब नाळे, इंदापूर उपाध्यक्ष दशरथ भोंग, युवाध्यक्ष धनाजी घोडके, हवेली अध्यक्ष विठ्ठल मासाळ, उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, मोहोळ तालुकाध्यक्ष हरी महाराज लोंढे, पंढरपूरचे राधेशाम देशमुख त्याच प्रमाणे राज्याच्या भागातील कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय अध्यक्ष हभप तुकाराम चवरे यांनी सांगितले की, ज्या ज्या वेळी वारकरी संप्रदायावर अन्याय झाला त्या त्यावेळी विश्व वारकरी सेना रस्त्यावर उतरली आहे. मंदिरांचा विकास करणे आणि ज्यांनी मंदिरांच्या जमिनी लाटल्या आहेत त्या परत मिळविण्यासाठी विश्व वारकरी सेना सज्ज आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. वर्षानुवर्षे वारकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील आणि वारकरी शासन दरबारी उपेक्षित राहणार असेल तर शासनाला आमची ताकद दाखवावी लागेल अशा शब्दात शासनावर हल्ला केला आहे. यावेळी जगन्नाथ देशमुख, तुकाराम भोसले, महादेव शिंदे, भाऊसाहेब ढगे, नानासाहेब पाटील, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

पुरंदर तालुकाध्यक्ष हभप लक्ष्मण यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे संत सोपानदेव महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. प्रास्ताविक उपाध्यक्ष प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दिलीप कदम यांनी केले. तर संभाजी महाराज बडदे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कीर्तनकार हभप रमेश उबाळे यांच्यासह राजेंद्र शेलार, तानाजी थोपटे, गणेश जगताप, ज्ञानेश्वर तांबे, पोपट वाघले, डॉ. राजेश दळवी, आड. श्रीकांत ताम्हाणे, श्रीरंग गायकवाड आदींनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा