जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा विवाह, मुलीच्या धाडसाने गुन्हा झाला उघड

जळगाव, १८ ऑगस्ट २०२२: जळगाव जिल्ह्यातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आला. परंतु मुलीने धाडस करून थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि झालेला प्रकार सांगितला. यानंतर या गुन्ह्याला वाचा फुटली. जळगाव येथील अवघ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह बीडच्या डोंगरी गावातील तरुणाशी बळजबरीने लावून देण्यात आला. परंतु मुलीने अतिशय धाडसाने लग्नाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आणि हा गुन्हा समोर आला.

मुलीला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने बस स्थानकातून थेट अंबड पोलीस स्टेशन गाठले, त्यानंतर तिने झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव येथील १५ वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या पूर्वी या मुलीचा विवाह बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये डोंगरी गावातील एका तरुणाशी ठरविला होता. वडिलांच्या निधनानंतरही मुलगी अल्पवयीन असताना तिचा विवाह लावून देण्यात आला. मात्र लग्नानंतर तिने मुलगा पसंत नाही आणि मला इथे राहायचे नाही अशी विनंती नातेवाईकांना केली. त्यामुळे तिच्या आईने आणि मामाने तिला पुन्हा जळगावला आणले होते.

परंतु पुन्हा सासरे तिला घ्यायला आले तेव्हा तिने जळगाव बस स्थानकातून सासऱ्याची नजर चुकवली आणी दुसऱ्या गाडीने जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस चौकी गाठली आणि आपली हकीकत पोलिसांसमोर सांगितली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तिची आई, मामा आणि सासऱ्यावर बालविवाह प्रतिबंधक कलमाखाली गुन्हा दाखल केला व पुढील तपासासाठी हा गुन्हा बीडच्या पाटोदा पोलीस स्टेशन कडे वर्ग केला आहे. या गुन्ह्यातील एकही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मुलीला इतर कोणाचाही आधार नसल्याने तिला सुधारगृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा