साखरेचा किमान विक्री दर रू. ३५०० करावा- हर्षवर्धन पाटील

इंदापूर, दि. १९ जून २०२०: साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) व ऊसाची एफआरपी यांचा ताळमेळ बसत नसल्याने साखर उद्योग गेली ३ वर्षांपासून अडचणीत आलेला आहे. या अडचणीतून साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) रू. ३५०० करावा, अशी मागणी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.१९) केली. यासंदर्भात केंद्र सरकारकडे विविध स्तरांवरून पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

साखरेचा उत्पादन खर्च हा वाढला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीमध्ये उत्पादन खर्च व उसाच एफआरपीची तुलना करता साखर कारखान्यांना प्रतिटन सुमारे रू.४०० एवढा तोटा सहन करावा लागत आहे. या अडचणीतून साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर हा रू.३१०० वरून रू. ३५०० करणे आवश्यक आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, साखरेचा उत्पादन खर्च व उसाची एफआरपीची रक्कम यांचा ताळमेळ बसत नसल्याने साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी आहेत तसेच देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला उठाव नसल्याने साखर उद्योग अडचणीत आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम देण्यास साखर कारखान्यांना आर्थिक अडचणी येत आहेत.

गेल्या चार-पाच वर्षांपासून राज्यातील साखर कारखानदारी साखरेचे घसरलेले दर, दुष्काळी परिस्थिती यामुळे तोट्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपीची रक्कम वेळेवर देण्यासाठी व बँकांच्या घेतलेल्या कर्जाच्या रकमेची परतफेड मुदतीत करण्यासाठी साखर कारखानदारीला आर्थिक दिलासा देणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तातडीने साखरेचा प्रति क्विंटलला किमान विक्री दर (एमएसपी) रू. ३५०० करण्याचा निर्णय घ्यावा,असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

तसेच लॉकडानमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा साखर उद्योगावर विपरीत परिणाम झालेला आहे, सध्या निर्यात बंद आहे, व्यापाऱ्यांकडून साखरेला फारसा उठाव नाही. अडचणीच्या परिस्थितीमध्ये साखरेचा किमान विक्री दर रु.३५०० पर्यंत वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांच्या एफआरपीचा व कामगारांचा विषय मार्गी लागणार नाही. साखरेच्या दरात थोडीशी वाढ झाली तरीही ग्राहकांच्या मासिक बजेटमध्ये फारशी वाढ होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या मागणीसंदर्भात केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वासही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा