CDS यांच्या अपघाताचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला

नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2021: सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. एबीपी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे जनरल रावत यांचे एमआय-17 हेलिकॉप्टर क्रॅश झाले. यामध्ये जनरल रावत, पत्नी मधुलिका यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला होता. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बंगळुरूमध्ये उपचार सुरू आहेत.

कुन्नूरच्या डोंगराळ जंगलात झालेल्या अपघाताचा व्हिडिओ कोईम्बतूर येथील फोटोग्राफर वाय जो पॉल उर्फ ​​कुट्टी यांनी टिपला होता, जे त्यावेळी जंगलात आपल्या मित्र आणि कुटुंबासह सुट्टीवर गेले होते. एका मीडिया हाऊसशी केलेल्या संभाषणात 52 वर्षीय कुट्टी यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी ते कटेरी येथील पर्वतांवर बांधलेल्या रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मित्र नसीर आणि कुटुंबासोबत फोटो काढत होते.

या अपघाताचे कारण शोधण्यासाठी मोठ्या स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. नुकताच हेलिकॉप्टर मधील ब्लॅक बॉक्स देखील मिळाला आहे. ब्लॅक बॉक्स संदर्भात माहिती मिळण्यास विलंब लागू शकतो. मात्र या अपघाताबाबत अनेक तर्क देखील लावण्यात येत आहेत. काही तज्ञांकडून परकीय हल्ल्याची शंकादेखील व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा