पंढरपूर, 30 मार्च 2022: श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे पदस्पर्श दर्शन बंद होते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे सर्वच गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम मंदिरांवर देखील झाला होता. दोन वर्ष वारीही बसनेच पार पडली आहे. यावरून अनेकदा वारकऱ्यांची आंदोलनही झाली. मात्र कोरोनामुळे अनेक सण, यात्रा उत्सव रद्द करण्यात आले होते. त्यामुळे विठ्ठल दर्शनावरही मर्यादा आल्या होत्या. मात्र आता वारकऱ्यांची आतुरता संपली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दोन दिवसापूर्वी शासनाकडे पदस्पर्श दर्शनाचा प्रस्ताव दिला होता. काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समवेत मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मंदिर समितीचे सदस्य यांच्यात बैठक झाली. यात पुन्हा पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे.
भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने. पुन्हा सर्व पूर्वपदावर येत आहे. पुन्हा थोडी मोकळीक मिळत आहे. मास्क आणि सोशल डिन्स्टिंग सोडलं तर इतर नियम हटवण्यात आले आहेत. पुन्हा धार्मिक स्थळांचा गजबटात वाढत आहे. आपल्या लाडक्या विठोबाचे भाविकांना पुन्हा दर्शन घेता येत आहे. या निर्णयामुळे विठू भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांना पुन्हा आपल्या विठोबाच्या पायांना स्पर्श करता येणार असल्याने चैतन्याचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे