बक्सर (बिहार), दि. २७ जुलै २०२०: आपल्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी आई वडील कोणतेही प्रयत्न करण्यास तयार असतात पण या प्रयत्नांना कधी यश येते तर कधी अपयश. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली. रुग्णालयामध्ये उपचारापूर्वी कागदपत्रांची तयारी कराण्यापुर्वीच्या अडचणीमुळे एका नवजात अर्भकाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना आहे बिहार येथील बक्सर मधील.
माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना येथे घडली आहे. आपल्या नवजात अर्भकाला वाचवण्यासाठी आई त्याला ट्रेमध्ये घेऊन रुग्णालयामध्ये फिरत होती तर त्या अर्भकाचे वडील हातामध्ये ऑक्सिजन सिलेंडर घेऊन त्या आईसोबत फिरत होते. एवढा सर्व आटापिटा करून देखील त्या नवजात अर्भकाचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले नाही. महत्वाचे म्हणजे ही घटना जिथे घडली ते क्षेत्र केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांचे संसदीय मतदार संघ आहे. येथील सदर रूग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या नवजात अर्भकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
बक्सरमधील सदर हॉस्पिटलची घटना ही २३ जुलैची आहे, परंतु त्यावेळी काढलेली दोन छायाचित्रे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातील एका छायाचित्रामध्ये त्या नवजात अर्भकाची आई त्या अर्भकाला एका ट्रेमध्ये घेऊन रुग्णालयांमध्ये फिरत आहे त्यासोबत एक व्यक्ती ऑक्सिजन सिलेंडर आपल्या खांद्यावरती घेऊन फिरताना दिसत आहे. रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यासाठी ज्या कागदपत्रांची तयारी करावी लागते त्या दरम्यान या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. त्या अर्भकाच्या पित्याने घडलेली ही सर्व घटना सांगितली आहे.
नवजात मुलाचा फोटो व्हायरल झाल्यावर आयुक्तांकडे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपविली आहे.
राजपूरच्या सखुआणा गावात राहणाऱ्या सुमन कुमारने आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी बक्सर मधुल सदर रुग्णालयात दाखल केले होते, परंतु रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी प्रसूती करण्यास नकार दिला, त्यानंतर त्यांनी पत्नीला खासगी रुग्णालयात हलवले. तेथेच डिलिव्हरी केली गेली, परंतु जेव्हा नवजात मुलाला श्वास घेण्यास त्रास झाला, तेव्हा कर्मचार्यांनी वडिलांच्या खांद्यावर ऑक्सिजनचे सिलेंडर आणि नवजात मुलाला ट्रेमध्ये घेऊन सदर रुग्णालयाकडे जाण्याचा मार्ग दर्शविला.
१८ कि.मी. अंतर चालल्यानंतर असाहाय जोडपे सदर रुग्णालयात पोहोचले, जिथे कागदपत्रे पूर्ण करण्यास दीड तासाचा कालावधी लागला आणि त्यादरम्यान नवजात मुलाचा मृत्यू झाला. इस्पितळ प्रशासनाचे दुर्लक्ष येथेच थांबले नाही, मृतदेहासह दाम्पत्याला घरी पाठवण्याची कोणतीही व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून केली नव्हती. यावेळी, सदर रुग्णालयात उपस्थित एका व्यक्तीने या घटनेची दोन छायाचित्रे काढून ती सोशल मीडियावर पोस्ट केली. यामुळे ही बाब प्रकाशात येऊ शकली. मात्र या घटनेनंतर जिल्हाधिकारी अमन सरीन यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी