पुणे, २३ डिसेंबर २०२२: पूर्वी झालेला वाद आणि एकत्र दारु पिताना झालेल्या भांडणातून आपल्याच मित्राचा खून करणाऱ्या तरुणाला कोथरुड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परेश शंकर कंदारे (वय वर्ष २९, रा. साईकृपा बिल्डींग लोकमान्य कॉलनी, कोथरुड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी वसंत अवसरे
(वय वर्ष २८, रा.लोकमान्य नगर, कोथरुड ) याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खून झालेल्या तरुण आणि आरोपी हे दोघेही मित्र असून उच्च शिक्षित आहेत. तसेच दोघेही कॉलसेंटरमध्ये नोकरीस होते. दोघांमध्ये पूर्वी वाद झाले होते. परंतू त्यांची मैत्री होती. घटनेच्या दिवशी ते दोघे दारु पिण्यासाठी एकत्र बसले असताना त्यांच्यात पूर्वीच्या त्या भांडणावरुन पुन्हा वाद झाला. याच वादातून अवसरे याने कंदारे यांचा गळा दाबून खून केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना हा खूनाचा प्रकार असल्याचे परिस्थिती जन्य पुराव्यावरुन समजले. या प्रकरणात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला होता. या अहवालातही खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अवसरेला बोलावून विचारणा केली असता, त्यावर त्यांने दारु पिल्यानंतर मी हे कृत्य केले असल्याचे कबूल केले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर