नवी दिल्ली, २८ जुलै २०२३ : राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत दोन महिलांच्या हत्या झाल्या असुन या खळबळजनक हत्यांमुळे दिल्ली हादरली आहे. दिल्लीत बिल्डरच्या पत्नीची हत्या झाल्यानंतर, आज दुपारी पॉश मालवीय नगर भागातील एका मुलीची लोखंडी रॉडने वार करून हत्या करण्यात आली आहे.
मालवीय नगर येथील कमला नेहरू महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीवर तेथिल उद्यानात लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. घटनेची माहिती मिळताच दिल्ली दक्षिणचे डीसीपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सदर घटनेची माहिती घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत मध्यरात्री एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तर ही २४ तासांत दुसरी घटना घडली आहे. मालवीय नगर सारख्या भागात एका मुलीला रॉडने मारुन खून करण्यात आला आहे. दिल्लीत महिला सुरक्षित नाहीत. यासंदर्भात मी केंद्र सरकारला महिला सुरक्षेसाठी बैठक बोलावण्याचे आवाहन करत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर