नाना पटोलेंच विधान हास्यास्पद

मुंबई, २५ ऑक्टोंबर २०२२: परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले तर शेतकरी हवालदील झाल्याचं चित्र राज्यात दिसत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात यावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू झालं आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. पण सरकारकडून अजूनही त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात केलेल्या टिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. “परतीच्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करायला सांगितले आहेत. ते निकषात बसोत अथवा न बसोत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हे बळीराजाचं सरकार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं आहे. एनडीआरएफच्या नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्तीची नुकसानभरपाई आपण दिलेली आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले

नाना पटोलेंची टिका

सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार शेतकरी विरोधी आहे. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात शिंदे सरकार त्यांना मदत करायला तयार नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त झालं पाहिजे. दिवाळीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिंदे सरकार बरखास्तीची मागणी करणार आहे, असं नाना पटोले म्हणाले होते.

दरम्यान नाना पटोलेंनी राज्यपालांच्या भेटीसंदर्भात केलेल्या विधानाचा एकनाथ शिंदेंनी समाचार घेतला. दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेऊन हे सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असं नाना पटोले म्हणाले आहेत. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारताच मुख्यमंत्री त्यावर आधी हसले आणि नंतर खोचक टोला लगावला.

विरोधी पक्षाचं कामच टीका करणं आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी टीका केली. त्यांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ. नाना पटोले यांचं विधान हास्यास्पद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा