नवी दिल्ली, ३ सप्टेंबर २०२० : चालू आर्थिक वर्षाच्या १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या पहिल्या ५ महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ७४४ किलोमीटर लांबीच्या महामार्ग बांधणीच्या कामांचं कंत्राट दिलं असून गेल्या ३ वर्षातील या कालावधीतील कामाचा हा उच्चांक मानला जात आहे.
एका बाजूला कोरोना प्रादुर्भावाचं संकट संपूर्ण देशावर घोंघावत असताना विकास कामांवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी देशभरातील एकंदर २६ प्रकल्पाना या कालावधीत मान्यता देण्यात आली असल्याचं प्राधिकरणाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या २६ प्रकल्पांमधील एकंदर गुंतवणूक सुमारे ३१ हजार कोटींहून अधिक असल्याचंही त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.
चालू आर्थिक वर्षात देशभरात मिळून किमान साडेचार हजार किलो मीटर लांबीच्या महामार्गांच्या प्रकल्पाना मान्यता देण्याचं उद्दिष्ट प्राधिकरणाने निश्चित केलं आहे. देशातील महामार्गांचे जाळं अधिक मजबूत व्हावं आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात या उद्देश्याने प्राधिकरण प्रयत्नशील असल्याचंही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी