मुंबई, ४ नोव्हेंबर २०२० :.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवेचं महत्व अधोरेखित झालं असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. नाशिकमधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकरण केलेल्या मुख्य प्रशासकिय इमारतीचं आणि सौरउर्जा प्रकल्पाचं कोश्यारी यांच्या हस्ते उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
आरोग्य क्षेत्रात तंत्रशुद्ध संशोधन आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचे कोश्यारी यांनी यावेळी मत व्यक्त केले. डॉक्टर आणि परिचारकांसारखं आरोग्य सेवेचे व्रत अंगिकारणे अवघड आहे, त्याहीपेक्षा वैद्यकीय शिक्षण घेणं अवघड आहे असं ते म्हणाले.
वैद्यकीय शिक्षण घ्यायची इच्छा असलेल्यांसाठी पायाभूत सुविधांची पूर्तता करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आर्युवेद, होमिओपॅथी, युनानी तसंच योगविद्येच्या उपयोगिताही त्यांनी अधोरेखित केली.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी