बारामती, ७ जानेवारी २०२१: गावातील सांडपाण्याचा व आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या मदतीची वाट न बघता भूमिगत गटार योजना राबवून सांडपाण्याची विल्हेवाट लावली. पणदरे येथील वृद्ध नागरिकांनी एकत्र येत तीन लाख रुपये खर्चून भूमिगत गटार बनविले आहे. गावागावात यात्रा जत्रांसाठी लोकवर्गणी केली जाते. मात्र, गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी पाच ज्येष्ठ नागरिकांनी स्वखर्चाने भुयारी गटार करून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्यांच्या कामाचे बारामती तालुक्यात कौतुक होत आहे.
पणदरे गावातील विद्यालया जवळील औद्योगिक विकास महामंडळाच्या उपसा योजने शेजारील वस्तीमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने आरोग्याच्या समस्यां उद्भवत असुन परिसरात दुर्गंधी वाढली आहे. यावर गावातील पाच वृद्ध नागरिकांनी मिळुन शासनाची वाट न बघता गावातील प्रश्नावर तोडगा काढला बारामतीचे निवृत्त गटशिक्षणाधिकारी किशोर पवार, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुधाकर जगताप, सेवानिवृत्त कंडक्टर बबनराव जगताप, माजी सरपंच रमेश जगताप सेवानिवृत्त बांधकाम उपअभियंता दिलीप धुमाळ यांच्या पुढाकाराने स्वखर्च करून भूमिगत गटार केली व सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी तीन लाख रुपये खर्चून साडेतीनशे फुट गटार बनवले आहे.
सेवानिवृत्त जेष्ठांनी आपल्या कुटुंबाची गावकऱ्यांची काळजी घेतली आहे. अनेक वेळा सांडपाण्यावर चर्चा झाली होती मात्र जेष्ठ नागरिकांनी निर्णय घेऊन अल्पावधित साडेतीनशे फुटांचे भूमिगत गटार बांधून अनेक दिवस रखडलेला सांडपाण्याचा प्रश्न सोडवला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव