राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल ११ किंवा १२ मे ला लागण्याची शक्यता

मुंबई, दि,१० मे २०२३ -: सुप्रीम कोर्टातील प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ज्या घटनापीठा समोर या प्रकरणाची सुनावणी झाली,त्या घटनापीठातील एक न्यायाधीश निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ता संघर्षाचा निकाल कधीही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्या दाव्यानुसार ११ किंवा १२ मे रोजी राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

सत्ता संघर्षाच्या निकाला विषयी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनीही १० मे नंतर कधीही निकाल येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनीही निकाल कधीही लागण्याची शक्यता वर्तवली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या खंडपीठातील सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांच्या निवृत्ती अगोदर केव्हाही निकाल लागू शकतो असे म्हटले आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्ता संघर्षावर दीर्घ युक्तिवाद झाल्यानंतर निकाल काय लागेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. निकालाबाबत प्रत्येक जण आपआपले अंदाज वर्तवत आहे. काहींच्या मते १६ आमदार अपात्र होतील. तर काहींच्या मते हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल. तसेच आमदार अपात्र झाले तरी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धोका नसल्याचे बोलले जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनीही तसाच दावा केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा