जिल्ह्यात नवमतदारांचा टक्का वाढला – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना, २४ जानेवारी २०२४ : यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनानिमित्ताने काल जिल्हाधिकारी कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून २०२४ च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवला गेला.

या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२३ च्या प्रारूप मतदार यादीत १५,५४,५१५ मतदारांची नावे समाविष्ट होती. त्यामध्ये ४४,५८३ नवीन मतदारांची भर पडलेली आहे. तसेच २९,४५४ मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये १५.१२९ मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या १५,६९,६४४ इतकी झालेली आहे. त्यानुसार ८,२३,५८० पुरुष मतदार, ७,४६,०२४ महिला मतदार आणि ४० तृतीयपंथी मतदार आहेत. महिला बचत गट अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायटी यांच्या सहकार्यामुळे यंदा महिला मतदारांची या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९०३ वरून ९०६ इतके झाले आहे.

या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये १२,५३५ मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच २० ते २९ या वयोगटात १८,३३३ मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या ५७५३ (०.३७ टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत १८,२८८ (१.१६ टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या २,९८,०३६ (१९.१७ टक्के) होती, ती अंतिम यादीत ३,१६,३६९ (२०.१५ टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था आणि महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार २२,२२५ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली.

त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये १०,४७७ एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज PSE) असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत ३०८१ मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज – DSE) ४६८८ मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून १२८८ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून पूर्ण कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे. मतदार यादी जितकी सर्वसमावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण १३८३ लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली. या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले. तसेच जिल्हयातील पाचही विधानसभा मतदारसंघात ही विशेष शिबिरे घेण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा