मुंबई, १ जून २०२१: लसी च्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारने दोन डोस मधील अंतर वाढवले आहे. लसीच्या दोन डोस मधील अंतर ८४ दिवसांचे करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना आपले लसीकरण पूर्ण करण्यासाठी बराच काळ लागत आहे. विशेष करून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे गैरसोयीचे होताना दिसत आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिकेने विशेष लसीकरण सुरु केलं आहे. शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोव्हिशील्ड लसींच्या दोन डोसमधील कालावधी कमी करावा, अशी मागणी मुंबई महापालिकेने केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे.
सध्या कोविशिल्डच्या दोन लसींमधील कालावधी ८४ दिवसांचा असल्याने, विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, दोन लसींमधील कालावधी ८४ दिवसांवरून ४२ ते ६० दिवसांवर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबतची माहिती दिली.
परदेशात ऑगस्टच्या सुरुवातीला कॉलेज सुरु होत असल्यानं त्यापूर्वी दोन्ही लस दिल्याचे सर्टिफिकेट मुलांना मिळणे आवश्यक आहे. सध्या मुंबईत सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी कस्तुरबा, कूपर आणि राजावडी इथं परदेशात जाणाऱ्यांना विद्यार्थ्यांना लस देणे सुरू आहे.
मुंबई महापालिकेचा पुढाकार
शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन सुविधेद्वारे लस देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून लसीकरणाबाबतच्या सुधारित नियमावलीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे त्यांना वॉक इन सुविधेद्वारे लस दिली जाणार आहे. यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे