श्रीरामपूर : रक्ताच्या नातेवाईकाला घर अथवा फ्लॅट विकायचा असेल किंवा हस्तांतर करायचा असेल तर त्यावर संपूर्ण स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण व लोकप्रिय निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता फक्त ५०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर स्थावर मालमत्ता हस्तांतरित करता येईल. सध्या नातेवाईकांना घर, फ्लॅट हस्तांतर करताना मालमत्तेच्या सरकारी किंमतीवर ५ टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.
ग्रामीण भागात घरकुलच्या लाभाकरिता जागा नावावर असणे ही महत्त्वाची अट होती व कुटुंबातील इतरांच्या नावावर जरी जागा असली तरी लाभार्थी ला त्याचा उपयोग होत नव्हता त्याकरीता खरेदी हाच एकमेव उपाय होता.
नव्या नियमानुसार, वडिलांकडून मुलगा, मुलीच्या नावावर तसेच मुलांकडून आई – वडिलांच्या नावावर, भाऊ – भाऊ व भाऊ बहिणीच्या नावावरील स्थावर मालमत्ता केवळ ५०० रूपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर हस्तांतर करता येणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या निर्णयामुळे रक्ताच्या नातेवाईकाला मिळकत हस्तांतरित करणे अधिक सुकर होणार आहे.
राज्य शासनाने स्थावर मालमत्तेच्या मालकी हस्तांतरण व विक्री बाबतच्या नियमांत बदल केले आहेत. त्यात रक्ताच्या नात्यातील मिळकतीवरील हस्तांतरण करताना संपूर्ण स्टॅम्प ड्युटी रद्द करण्यात आली आहे. मात्र, सरकारी नियमानुसार कोणत्याही व्यवहाराबाबत व अदलाबदलीसाठी ५०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर हस्तांतरण होईल.
सरकारी किंमतीनुसार एखाद्या घराची, फ्लॅटची २० लाख रूपये किंमत असेल तर १ लाख रूपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मुंबईत तर १ कोटींचा फ्लॅट खरेदी केला तर संबंधितांना ५ लाख रूपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. त्यामुळेच कुटुंबातील व रक्तातील व्यक्तीच्या नावावर घर करायचे झाल्यास नागरिकांना फायदा होणार आहे.
नोंद –
खरदीखत करते वेळी खरेदी आणि विक्री करणाऱ्या दोघांची ओळख दर्शवणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि दोघांचा जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे.