नोटांचं राजकारण

मुंबई, २७ ऑक्टोंबर २०२२ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला आवाहन करत भारतीय चलनावर गांधीजींसोबत माता लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असायला हवा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या या मागणीवर भारतीय जनता पार्टीने केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. तर महाराष्ट्रामधील नेत्यांकडूनही याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

नितेश राणे यांची प्रतिक्रिया

एक नागरिक म्हणून ही माझी वैयक्तिक मागणी असून, पक्षाची भूमिका नाही. एक शिवप्रेमी म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना जगभरात मान्यता आहे. केंद्र सरकार काही विचार करत असेल तर अशा महापुरुषाचा फोटो तिथे छापणं योग्य ठरेल. ट्विटरच्या माध्यमातून माझ्या याच भावना मी मांडल्या आहेत,” असं नितेश राणेंनी माध्यमांशी बोलताना सांगितल आहे.

तसेच यासंबंधी तुम्ही वरिष्ठ पातळीवर काही पत्र देणार आहात का? असं प्रश्न विचारण्यात आलं असता ते म्हणाले नक्कीच हो. जर केंद्र सरकार असा काही विचार करत असेल तर मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करेन. तशी काही शक्यता असल्यास महाराजांचा फोटो नोटांवर आला तर त्यापेक्षा मोठा अभिमान असू शकत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही महाराजांबद्दल आदर आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन मी याबाबत अधिक माहिती घेईन असे नीतेश राणे म्हणाले.

तसेच भाजपाचे आमदार राम कदम यांनी नोटांच्या वादात उडी घेतली आहे, राम कदम यांनी ट्विट करत नोटांचे चार फोटो शेअर केले आहेत.

एका फोटोवर छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या फोटोवर बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या फोटोवर सावरकर तर चौथ्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी. अशा चार नोटांचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी ! अशी कॅप्शन दिली आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याला नवं वळण लागलं आहे. केजरीवाल यांच्या या विधानाचा संबंध थेट गुजरात निवडणुकीशी लावला जात असून केजरीवाल गुजरातमध्ये हिंदुत्वाचं कार्ड खेळणार असल्याचं बोललं जात आहे.

बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटांच्या नवीन नोटेवर का लावावा, असे ट्विट त्यांनी केले आहे. नोटेवर एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकरांचे चित्र लावावे, असे ते म्हणाले आहेत. आणि हे अहिंसा आणि संविधानाचे अनोखे प्रतीक असेल, तसेच हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, जे सरकारने उचलले पाहिजे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल अशी मला आशा आहे, असे मनिष तिवारी म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली होती. “दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आला असून अनेकांशी आपली याबाबत चर्चा झाली आहे. कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवे आहेत.

तसेच केजरीवाल पुढं म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भारत समृद्ध देश व्हावा, लोकांनी श्रीमंत व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी अनेक पावलं उचलावी लागतील. आपल्याला रुग्णालये बांधावी लागतील, मोठ्या प्रमाणात शाळा उघडाव्या लागतील. पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. यासाठी देवाचा आशीर्वाद असेल तेव्हाच आमचे प्रयत्न यशस्वी होतील, असंही केजरीवालांनी स्पष्ट मत सांगितल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा