काबूल, १५ जुलै २०२१: तालिबाननं अफगाणिस्तानातील विविध भाग ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, अफगाण सरकारच्या वार्ताकाराने गुरुवारी सांगितलं की, तालिबान्यांनी ७,००० विद्रोही कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात तीन महिन्यांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिलाय. अफगाण सरकारचे प्रवक्ता नादर नादरी म्हणाले की, ही मोठी मागणी आहे. याबरोबरच विद्रोही तालिबान नेत्यांना युएनच्या काळ्या यादीतून हटवण्याचीही मागणी केलीय.
अफगाण नेते दोहा चर्चेच्या अजेंडावर चर्चा करण्यास तयार असताना तालिबानची ही मागणी समोर आलीय. टोलो न्यूजनुसार, राष्ट्रपती अशरफ गनी हे गुरुवारी अफगाणिस्तानातील राजकीय नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्ष असतील. या बैठकीमध्ये तालिबान्यांशी चर्चा करण्याच्या मुद्द्यावर बोलणी केली जातील. अफगाण राजकारण्यांची ११ सदस्यांची टीम या आठवड्याच्या अखेरीस दोहा येथे शांती प्रक्रियेवर तालिबान्यांशी चर्चा करण्यासाठी येणार आहे.
गुरुवारी होणाऱ्या बैठकीत दोहा चर्चेचा अजेंडा आणि भेटीच्या टाइमलाइनवर चर्चा होणार आहे. ११ सदस्यीय संघाचे सदस्य मोहम्मद करीम खलीली यांनी बुधवारी सांगितलं की तालिबान्यांशी चर्चेचा मुख्य अजेंडा युद्धबंदीचा असेल. आम्ही टाइमलाइनवर चर्चा करीत आहोत. चर्चेच्या अजेंडाबाबत शुक्रवारी हे चित्र स्पष्ट होईल.
खलिली म्हणाले, “आम्ही सर्व लढाऊ पक्षांना चेतावणी देतो की युद्धानं उत्साही होण्याची गरज नाही. ही परिस्थिती जर राहिली तर आपण अफगाणिस्तानला आणखी नाजूक परिस्थितीत ढकलू.” अफगाण राजकीय नेत्यांशी चर्चेत या गटाचे मुख्य वार्तालाप मुल्ला अब्दुल गनी बरादर तालिबानी शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार असल्याचं तालिबानने म्हटलं आहे. गुलबुद्दीन हेकमतियार यांच्या नेतृत्वात हिज्ब-ए-इस्लामी यांनी म्हटले आहे की हेक्मतियार हे या बैठकीलाही उपस्थित राहतील.
हिज्ब-ए-इस्लामीचे सदस्य हुमायूं जरीर यांनी सांगितलं की, तालिबान्यांशी शांतता चर्चेसाठी हेक्मतियार वरिष्ठ अफगाण नेत्यांसमवेत दोहाच्या बैठकीत भाग घेतील. राष्ट्रीय समन्वयाची उच्च परिषद (एचसीएनआर) चे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनीही दौऱ्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशात शांतता प्रस्थापित करणं हे सांगितलं.
दरम्यान, गुरुवारी पाकिस्तान बाजूच्या लोकांनी मोठ्या संख्येने अफगाणिस्तान सीमेवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीमेवर जमा झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचे गोळे वापरावे लागले.
अफगाण बाजूनं तालिबान्यांनी स्पिन बोल्दक जिल्ह्यातील क्रॉसिंग ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानने त्याची सीमा सील केली. एका पाकिस्तानी अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुमारे ४०० लोकांच्या अनियंत्रित जमावाने सक्तीने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दगड फेकले आणि आम्हाला अश्रुधुराचा वापर करण्यास भाग पाडलं.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेच्या सीमेवर सुमारे १,५०० लोक जमले होते. नाव न सांगण्याच्या अटीवर दुसर्या अधिकाऱ्यानं सांगितले की, लोक अनियंत्रित होत असल्यामुळं आम्हाला लाठीमार करावा लागला. चमन सीमेवर तैनात ज्येष्ठ सरकारी अधिकारी जुमादाद खान यांनी सांगितलं की, परिस्थिती आता “नियंत्रणात” आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे