पंजाब आणि छत्तीसगड सरकार लखीमपूर खेरीमध्ये मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 50-50 लाख रुपये देणार

नवी दिल्ली, 7 ऑक्टोंबर 2021: पंजाब आणि छत्तीसगड सरकारने लखीमपूर खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचं अनुदान जाहीर केलंय.  घटनेच्या कव्हरेज दरम्यान मारल्या गेलेल्या पत्रकाराच्या कुटुंबाला 50 लाख रुपये देण्याबाबतही ते बोलले आहेत.  दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून दिली जाणारी आर्थिक मदत योगी सरकारच्या भरपाई रकमेपेक्षा जास्त आहे.
योगी सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.  मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल.  तसेच जखमींना 10 लाख दिले जातील.  त्याचबरोबर या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, लखीमपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यासह पत्रकाराच्या कुटुंबाला त्यांच्या सरकारकडून 50 लाख रुपये दिले जातील.  ते म्हणाले की, नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्यावर हल्ला कसा झाला याचे मला वाईट वाटते.  जर शेतकरी मारले गेले तर आम्ही गप्प बसू शकत नाही.
 मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, संपूर्ण भारत पीडितांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे.  छत्तीसगड सरकार प्रत्येक पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आणि पीडित पत्रकाराच्या कुटुंबाला 50 लाख रुपये देणार आहे.
 पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी राहुल गांधी यांच्यासह दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आज लखीमपूरला जात आहेत.  भूपेश बघेल मंगळवारीच पीडित कुटुंबाला भेटायला जाणार होते, परंतु सुरक्षेचा हवाला देत योगी सरकारने त्यांना लखनऊ विमानतळावरून बाहेर पडू दिले नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा