कळंब, दि. १७ मे २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याचे समजले. कळंब तालुक्यात ३ कोरोना रूग्ण आढळून आले, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यापैकी पाथर्डी येथील दोघे मुंबई येथून परतलेले होते. तर अन्य एक रुग्ण महसूल विभागाचा कर्मचारी असून, ते कळंब शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील २६ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते.
काल दिनांक १६ मे रोजी सर्वांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून, या ठिकाणी नियमित अहवाल पाठविण्याचे काम सुरूच आहे. कळंब तालुक्यात बाधितांची संख्या अचानक तीनवर गेल्याने प्रशासनाने कडेकोट टाळेबंदी केली आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन दक्ष आहे. शहरातील एक आणि पाथर्डी येथील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब १४ मे रोजी उघड झाली होती. त्यानंतर दोघांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका रुग्णाला उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड