निगडी, २ फेब्रुवारी २०२३ : सर्वांत महत्त्वाची प्रवासी सेवा म्हणून ओळखल्या जात असलेल्या ‘पीएमपीएल’च्या बसथांब्यांवर रिक्षावाले, छोटे व्यावसायिक, फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. खासगी वाहने बसथांब्याबाहेरच उभी केली जातात. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते; तसेच ‘पीएमपीएल’च्या बसगाड्या उभ्या करण्यासही चालकांना अडचणी येतात. इतकेच नव्हे, तर फेरीवाले, खासगी वाहनचालकांच्या गराड्यात प्रवासी अडकून पडतात.
दरम्यान, ‘पीएमपीएल’च्या प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. पीएमपीएल प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणचे बसथांबे स्टीलचे आकर्षक केले आहेत. ऊन आणि पावसापासून प्रवाशांचे रक्षण व्हावे, यासाठी बसथांब्यांवर शेडही टाकण्यात आले आहेत; मात्र या बसस्थानकांमध्ये गर्दुल्ले, भिकारी, फेरीवाले यांनी अतिक्रमण केले आहे, तर बसथांब्यांबाहेरील जागेचा वापर खासगी वाहने उभी करण्यासाठी होत आहे. त्यामुळे अनेकवेळा प्रवासी वैतागून ऑटो-रिक्षा किंवा अन्य पर्याय निवडतात. याचा परिणाम ‘पीएमपीएल’च्या उत्पन्नावर होत आहे.
नियमानुसार ‘पीएमपीएल’च्या बसथांब्यापासून २० मीटरपर्यंत वाहने पार्क करण्यास सक्त मनाई आहे. तरीही सर्व नियम धाब्यावर बसवून बसथांब्याजवळ रिक्षा व इतर वाहने पार्क केली जातात. फेरीवाल्यांनीही त्यांचे बस्तान बसथांब्यावर बसविले आहे.
निगडी येथील मुख्य बसथांब्याची दुरवस्था पाहून खूप वाईट वाटते. येथील मुख्य बसथांब्यावर; तसेच भोसरी, देहू, वासोली, म्हाळुंगेकडे जाणाऱ्या बसथांब्यावर मोठ्या प्रमाणात रिक्षा थांबलेल्या असतात. बस आली की बससमोरच रिक्षावाले रिक्षा लावतात. उन्हात तर त्रास होतोच मात्र पावसाळ्यात तर अधिकच त्रास होतो. कारण बसच्या दोनही दरवाजांजवळ रिक्षा लावलेल्या असतात. त्यामुळे बसमध्ये चढता-उतरताच येत नाही. परिणामी रिक्षावाले प्रवाशांसह चालक-वाहकांनाही त्रास देतात.
आकुर्डी रेल्वेस्टेशन येथील बसथांब्यावर याहून वेगळी स्थिती नाही. बसथांब्याच्या आजूबाजूला छोट्या टपऱ्या, जवळच रिक्षावाले रिक्षा लावतात. दुरवस्थेमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्यांचे तर ठीक आहे; मात्र ज्येष्ठ नागरिकांचे खूपच हाल होतात.
निगडी, आकुर्डीप्रमाणेच थरमॅक्स चौक, केएसबी चौक, अनुकूल चौक, इंद्रायणी चौक, लांडेवाडी चौक आदी विविध बसथांब्यांवर हीच स्थिती आहे. यामुळे हे बसथांबे प्रवाशांसाठी आहेत की अन्य कोणासाठी? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
‘पीएमपीएल’ प्रशासनालाही या समस्येबाबत माहिती असणार; पण कारवाई करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
‘पीएमपीएल’ बसच्या बसथांब्यांवरील अतिक्रमण, खासगी वाहनांचा विळखा यावर परिवहन विभाग, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग व पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सहकार्याने वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते. बसथांब्यापासून २० मीटपर्यंत कुठलेही वाहन उभे करण्यास मनाई आहे; मात्र खासगी वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लघंन करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. तरी ‘पीएमपीएल’ प्रशासनाने बसथांब्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील