धोनीचा टॅलेंट बघून मोडावे लागले नियम , विश्व क्रिकेटमध्ये झळकला कॅप्टन कुल

पुणे, दि. ७ जुलै २०२०: झारखंडचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ज्याला वयाच्या २३ व्या वर्षी भारतीय संघाकडून खेळण्यासाठी आमंत्रित केले जाते आणि मिळालेली ही संधी न डावलता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटलावर आपला ठसा उमटविण्यासाठी सज्ज होतो. या खेळाडूने आपल्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये पाचव्या एकदिवसीय सामन्यांमध्ये १४८ धावा केल्या आणि याच प्रमाणे आपल्या पाचव्या सराव सामन्यांमध्ये म्हणजेच टेस्ट सीरिजमध्ये पुन्हा १४८ धावांचे शतक ठोकले.

भारताचा कट्टर प्रतिद्वंद्वी मानला जाणा-या पाकिस्तान संघाच्या विरोधात या खेळाडूने आपल्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अशी दोन शतके ठोकल्यामुळे सर्वत्र तो चर्चेत राहिला व सर्वांकडून कौतुक देखील मिळवले. इतकेच नव्हे तर पुढे जाऊन तो भारतीय संघाचे भविष्य ठरला. होय!.. चर्चा होत आहे आयसीसीचे तीनही विश्वचषक जिंकणारा एकमेव कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल. महेंद्रसिंग धोनी अर्थात आपला लाडका ” माही ” चा आज वाढदिवस आहे. आज तो ३९ वर्षाचा झाला आहे.

वास्तविक, महेंद्रसिंग धोनी हा बीसीसीआयच्या प्रतिभा संशोधन विकास विभाग (टीआरडीडब्ल्यू) चा शोध होता. त्याची प्रतिभा लक्षात घेता या कार्यक्रमाशी संबंधित वयाशी संबंधित नियम त्यांना शिथिल करावे लागले. यावर चर्चा करण्यापूर्वी धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवर नजर टाकू.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवताच धोनीची तुलना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अ‍ॅडम गिलक्रिस्टशी केली गेली . तसेच शेवटच्या षटकापर्यंत विजयाच्या पाठलाग करण्यात माहिर असलेल्या माहीमध्ये मैच फिनिशर म्हणून मायकेल बेव्हानची झलक पहायला मिळाली. तीन वर्षांत धोनीला वनडे आणि टी -२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी -२० विश्वचषक जिंकला आणि पुढच्याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये सीबी सीरिज फायनल हि जिंकली.

यानंतर, धोनीने २००८ मध्ये कसोटी कर्णधारपद स्वीकारले आणि डिसेंबर २००९ मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडवर आठवणीत राहिल असा मालिका विजय नोंदविला, यानंतर भारत कसोटी क्रिकेटमध्ये क्रमांक एकचा संघ बनला. पण त्याच्या नेतृत्वात, २०११ आणि २०१२ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताला सलग आठ पराभवांचा सामना करावा लागला आणि या लज्जास्पद पराभवामुळे भारताला अव्वल मानांकन गमवावे लागले.

पण हार मानेल तो धोनी कसला. २०११ मध्ये त्याने भारताला विश्वकरंडक जिंकून दिला. त्यानी २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाला आपल्या मायदेशात ४-० ने पराभूत केले आणि त्यानंतर त्याचवर्षी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, असेच अजिंक्य राहत पुढच्या वर्षी टी -२० विश्व करंडकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पोहचवले.

डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या मध्यामधेच धोनीने अचानक कसोटी कर्णधारपद सोडले. एवढेच नव्हे तर त्याने कसोटी क्रिकेटमधून त्वरित निवृत्ती घेण्याचीही घोषणा केली. २०१७ मध्ये धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला (मर्यादित षटकांच्या स्वरूपातून) आणि विराट कोहलीला त्याचा उत्तराधिकारी होण्याचा मार्ग मोकळा केला.

विश्वचषक-२०१९ मध्ये महेंद्रसिंग धोनीची सुस्त फलंदाजी हे समीक्षकांचे लक्ष्य होते. उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्यापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या सेवानिवृत्त होण्याबाबतही कयास होता. यावर्षी तो आयपीएलबरोबर पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, पण कोविड -१९ मुळे टी -२० लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

धोनीसाठी असा झाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मार्ग मोकळा

कौशल्य शोधण्याच्या दृष्टीने दिलीप वेंगसरकर हे भारतातील एक उत्तम निवडकर्ता मानले जातात. २००६ ते २००८ या कालावधीत निवड समितीच्या अध्यक्षपदी या माजी कर्णधारपदाचा कार्यकाळ निवड समितीसाठी फारच उपायोगी ठरला कारण त्यांनी निवड केलेला धोनी नंतर भारतीय संघाचा कर्णधार बनला.

वेंगसरकरांचा असा विश्वास आहे की निवड समितीचे अध्यक्ष म्हणून ते न्याय करण्यात यशस्वी झाले, कारण ते धोनीसारख्या क्रिकेटपटूंच्या कलागुणांचा शोध लावणाऱ्या बीसीसीआयच्या (भारतीय क्रिकेट बोर्ड) प्रतिभा संशोधन विकास विभाग (टीआरडीडब्ल्यू) शी संबंधित होते. महत्वाचे म्हणजे आता टीआरडीडब्ल्यू पण अस्तित्वात नाही.

महेंद्रसिंग धोनीचा वयाच्या २१ व्या वर्षी बीसीसीआयच्या टीआरडीडब्ल्यू योजनेत समावेश करण्यात आला होता, तर त्यासाठी १९ वर्षांचे वय निश्चित करण्यात आले होते. त्यामागे एक अतिशय रंजक कथा आहे. वास्तविक, बंगालचा माजी कर्णधार प्रकाश पोद्दार यांच्या आदेशानुसार धोनीचा टीआरडीडब्ल्यूमध्ये समावेश होता. पोद्दारांच्या आग्रहावर वेंगसरकर यांनी निर्णय घेतला की हुशार खेळाडूंच्या मार्गात नियम येऊ नयेत.

पोद्दार जमशेदपूरमध्ये अंडर -१९ सामना पाहण्यासाठी गेले होते. त्याचवेळी, बिहारचा संघ लगतच्या केनन स्टेडियममध्ये एकदिवसीय सामना खेळत होता आणि चेंडू पुन्हा पुन्हा स्टेडियममधून बाहेर पडत होता. त्यानंतर पोद्दार यांना उत्सुकता निर्माण झाली की आतापर्यंत चेंडू कोणाकडून मारला जात आहे. जेव्हा त्यांनी बघितले तेव्हा त्यांना धोनीबद्दल कळले.

वेंगसरकर म्हणाले, “पोद्दारांच्या सांगण्यावरून वयाच्या २१ व्या वर्षी धोनीला टीआरडीडब्ल्यू कार्यक्रमाचा एक भाग बनविण्यात आले होते.” ते म्हणाले की टीआरडीडब्ल्यूची सुरुवात माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी केली होती. तथापि, दालमिया यांनी निवडणूक हरल्यानंतर ती बंद करण्यात आली.

धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

महेंद्रसिंग धोनीने ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये ५०,५७ च्या सरासरीने १०,७७३ धावा केल्या, त्यामध्ये १० शतके आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद १८३ अशी होती. यष्टीरक्षक म्हणून कामगिरी बजावताना त्याने ४४४ वेळा फलंदाजांना बाद केले आहेत.

धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. त्याने ६ शतके आणि ३३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या २२४ धावा होती. कसोटी सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून काम बजावत असताना त्याने २९४ बळी घेतले.

त्याने भारताकडून ९८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३७ अर्धशतकांसह ३७.६० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या. त्याची सर्वाधिक धावसंख्या ही ५६ होती. यात यष्टीरक्षकाची कामगिरी बजावत असताना त्याने ९१ बळी घेतले.

अशा या संपूर्ण देशाच्या लाडक्या क्रिकेटपटूला ” महेंद्रसिंग धोनी ” उर्फ ” माही ” ला न्यूज अनकट परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा