पुणे, २४ ऑक्टोंबर २०२२: आज देशभरात दिवाळी साजरी होत आहे. दरम्यान, शेअर बाजारात सुट्टी असूनही गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वास्तविक, आज होणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी गुंतवणूकदारांनी तयारी केली असून या एक तासाच्या विशेष सत्रात गुंतवणूकदार विविध शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करतील अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या अत्यंत शुभ मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही सांगत आहोत की मार्केटमध्ये कोणत्या वेळी ट्रेडिंग सुरू होईल आणि कोणत्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही नफा मिळवू शकता.
दिवाळीला गुंतवणूकदार गुंतवणूक शुभ मानतात
शेअर बाजारात दिवाळीच्या सणाला मुहूर्त साधण्याची परंपरा सुमारे ५० वर्षे जुनी आहे. दिवाळीचा सण हिंदू नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेची सुरुवात करतो. संपूर्ण भारतात, हा सण संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य यांचे स्वागत करण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जातो. त्याचप्रमाणे या मुहूर्ताच्या ट्रेडिंगशी अशीच एक धारणा आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार गुंतवणूक सुरू करण्यासाठी हा दिवस खूप खास मानतात.
स्टॉक एक्स्चेंजमध्ये मात्र दिवाळीनिमित्त सुट्टी जाहीर केली जाते. पण सुट्टीच्या दिवशीही खास संध्याकाळी एक तास उघडला जातो, त्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. आज २४ ऑक्टोबर २०२२ रोजी, संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ पर्यंत, बाजार मुहूर्त ट्रेडिंग उघडेल. ब्लॉक डील सेशन संध्याकाळी ५.४५ ते ६ वाजेपर्यंत असेल, तर प्री-ओपनिंग सेशन संध्याकाळी ६ ते ६.०८ पर्यंत असेल. जुन्या आकडेवारीवर नजर टाकली तर मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. यावेळीही या विशिष्ट ट्रेडिंग मध्ये सेन्सेक्स ६० हजारांचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे.
उपयोगी पडेल तज्ज्ञांचा सल्ला
मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान शेअर्समध्ये गुंतवणुकीबाबत काही खास गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला तोटा होणार नाही, परंतु तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे नफा मिळू शकतो. यासाठी शेअर बाजारातील तज्ज्ञांनी टिप्स दिल्या आहेत. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, तज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टींना चिकटून राहा आणि अल्पावधीत लवकर परतावा मिळवण्यासाठी घाईघाईने निर्णय घेऊ नका. त्यांनी गुंतवणूकदारांना मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
२०२१ ला सेन्सेक्स ६० हजारांच्या पुढं
गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर २०२१ रोजी दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. एका तासाच्या या सत्रात बीएसई सेन्सेक्स ६० हजारांच्या वर पोहोचला होता. मुहूर्तावर सेन्सेक्स ६०,०६७ अंकांच्या पातळीवर तर निफ्टी १७,९२१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. सध्या, जर आपण सेन्सेक्सबद्दल बोललो तर तो शुक्रवारी १०४.२५ अंकांवर चढला होता आणि ५९,३०७.१५ च्या पातळीवर बंद झाला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे