कोरोनाची दुसरी लाट, युरोपमध्ये अनेक देशांनी जाहीर केले लॉक डाऊन

ब्रिटन, २९ ऑक्टोबर २०२०: जगात दररोज कोरोना विषाणूचं प्रमाण वाढत आहे. युरोपमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. परिस्थिती नियंत्रणात नसल्याचं पाहून ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससह युरोपमधील अनेक देश पुन्हा लॉकडाऊन टाकण्याची तयारी करीत आहेत. एका महिन्यासाठी जर्मनीनं रेस्टॉरंट्स आणि बार बंद करण्याचे आदेशही जारी केले आहेत.

जर्मन चांसलर अँजेला मॉर्केल यांनी हे निर्बंध अधिक कठोर करण्यासाठी जर्मनीच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर फ्रान्समध्ये दिवसाला ५० हजाराहून अधिक प्रकरणांनंतर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं आहे की, कोरोनासंदर्भात नवीन नियम व निर्बंधासाठी आपण तयार असलं पाहिजे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात युरोपमध्ये कोरोनाच्या बाबतीत ३७ टक्के वाढ झाली आहे. युरोपमध्ये १३ लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं असे म्हटले जात आहे की युरोपमध्ये आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर करण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिटनमधील बर्‍याच भागात लॉकडाउन

ब्रिटनमध्ये केवळ एका आठवड्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कित्येक शहरांमध्ये कडक लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने वेल्स, ग्रेटर मँचेस्टर, लिव्हरपूल सिटी, लँकशायर, साउथ यॉर्कशायर आणि स्कॉटलंड येथे लॉक डाऊन घोषित केलं आहे. इतकंच काय तर या भागांमध्ये लोकांना आपलं घर सोडण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

हिवाळ्यात परिस्थिती भयानक होण्याची शक्यता

आरोग्य तज्ञांचा असा दावा आहे की, हिवाळा आला की कोरोना संसर्ग भयानक रूप धारण करू शकतो. त्याचा परिणाम आता युरोपमध्येही दिसू लागला आहे. अलीकडं युरोपमध्ये २,०५,८०९ नवीन कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. फ्रान्समधून सर्वाधिक ४५ हजार आणि ब्रिटनमध्ये २३ हजार प्रकरणं समोर आली आहेत. युरोपमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोना प्रकरणात ३७ टक्के वाढ झाली आहे.

आता कोणत्या देशांवर निर्बंध आहेत…

युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये दुसरी कोरोना लाट लक्षात घेता नवीन निर्बंध लागू केले गेले आहेत. बेल्जियमनं सर्व बार वर नवीन निर्बंधांचे आदेश दिले आहेत – रेस्टॉरंट्स सोमवारपासून सुमारे एक महिन्यासाठी बंद ठेवले जातील, तर इटलीनं लोकांना घराबाहेर पडण्यासाठी मास्क बंधनकारक केले आहेत. येथे सायंकाळी सहा नंतर बार आणि रेस्टॉरंट बंद होतील.

फ्रान्सबद्दल बोलताना सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत ९ मोठ्या शहरांमध्ये कर्फ्यू आहे. अनावश्यक बाहेर जाण्यासाठी दंड देखील भरावा लागू शकतो. जर्मन चांसलर अँजेला मॉर्केल यांनी लोकांना घरी राहण्याचं आवाहन केलं. त्याच वेळी ब्रिटनमधील बर्‍याच शहरांमध्ये कडक लॉकडाउन आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा