पिण्याच्या पाण्यासाठी मांजरीतील वस्ती वणवणली, संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा!

50

पुणे, २६ फेब्रुवारी २०२५: हडपसर मांजरी बुद्रुक येथील मांजराईनगर परिसरातील झोपडपट्टीमधील नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला आहे. पिण्याचे आणि वापराचे पाणी बंद झाल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. माळवाडी, कुंजीर वस्ती, वेताळ वस्ती, राजीव गांधी नगर, सटवाई नगर, ११६ घरकूल, ७२ घरकूल, आदी झोपडपट्टी भागासह गावठाणमध्ये ग्रामपंचायत काळातील बोरवेलचे पाणी मिळायचे. मात्र, गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर परिस्थिती बदलली.

पाण्यासाठी ५० दिवस बेमुदत धरणे आंदोलन केल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. दोन वर्षे दिलासा मिळाला, परंतु जीवन प्राधिकरणाची पाच दशलक्ष क्षमतेची टाकी असूनही, मुख्य जलवाहिन्यांमधून घरोघरी नळजोडणी देताना रस्त्यांची अर्धवट खोदाई, उघड्यावर प्लास्टिक पाइपलाइन यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वापरण्याचे पाणी बंद झाले आहे, तर जीवन प्राधिकरणाचे पाणी चार-पाच दिवसांनी येत आहे.

नवीन वाढलेल्या केशवनगर हद्दीपर्यंत बेकायदेशीर जलवाहिनीने पाणीपुरवठा केल्याने वॉर्ड क्रमांक तीनमधील सैनिकनगर साठ फुटी रोड येथील नागरिकांसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे आवश्यक असताना, केवळ फ्लेक्सबाजीमुळे झोपडपट्टी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

महानगरपालिका वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याने गरीब नागरिक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. ७२ घरकूल व ११६ घरकूल झोपडपट्टीमध्ये चार इंच बिडाची पाइपलाइन टाकून नळजोडणी द्यावी, तोपर्यंत बंद केलेले पाणी सुरू करावे आणि दररोज टँकरने पाणीपुरवठा करावा, अन्यथा महापालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राजेंद्र साळवे यांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे