जळगाव, २२ ऑक्टोबर २०२२ : सरकार स्थापन करणे आणि चालवणे किती तारेवरची कसरत करावी लागते याचा प्रत्यय एकनाथ शिंदेंना येत आहे. शिंदे गटात नाराजी वाढत असल्याचे दिसत आहे. आता शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे उदाहरण देऊन एका-एका मतावर सरकार येतं आणि कोसळतंही असे आपल्याच मंत्र्याला सुनावले आहे.
गुलाबराव पाटील यांनी आपल्याच आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या मुलाच्या लोकांना पाणीपुरवठ्याची कामं दिल्याने चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यात संघर्ष पेटला आहे. चिमणराव पाटीलांनी गुलाबराव पाटीलांना चांगलेच सुनावले आहे. मंत्री झालेत म्हणून सरकार खाजगी मालमत्ता होत नाही असे म्हणत सरकार आहे म्हणून तुम्ही मंत्री आहात याचे थोडेसे भान राहू द्या असे म्हटले आहे.
मला डावलण्याचा त्यांचा काय संबंध?
“एका सरकारमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते बनवण्यात प्रत्येकाचा वाटा असतो. एकेक मतावर सरकार येत आणि कोसळतं. त्यामुळं कोणी मंत्री झाला तर सरकार त्याची खासगी मालमत्ता नसते. सर्व मिळून सरकार आलेलं असतं आणि म्हणून तुम्ही मंत्री आहात याचं भान कायम ठेवलं पाहिजे. माझ्यावर अन्याय झाल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांना फोन केला. त्यांनी फोनवर यापुढे असं व्हायला नको असं सांगितलं. मला डावलण्याचा त्यांचा काय संबंध? ते डावलतात हे एकदम चुकीचे आहे,” असा रोष चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर काही महिन्यांपूर्वीच राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं. अशात आता शिंदे गटाच्या आमदारांमध्येच धुसफूस सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्याच गटातील आमदार आणि मंत्र्यांचा संघर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा थांबवणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड