बॉलिवूड डेस्क : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित-नेने आता चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे वळली असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. ’15 ऑगस्ट’ या मराठी चित्रपटानंतर आता माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने ‘पंचक” हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. आज (10 ऑक्टोबर) या चित्रपटाचा मुहूर्त झाला. माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला असून यात ती पती नेनेंसोबत दिसत आहे. दोघांच्याही हातात क्लॅप बोर्ड आहे. फोटो शेअर करुन माधुरीने लिहिले, ”निर्माती म्हणून अजून एक रोमांचक चित्रपट “पंचक” तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, पांचकच्या संपूर्ण टीमला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.”
‘पंचक’ चित्रपटात कोकणची पार्श्वभूमी…
पंचक या चित्रपटाला कोकणची पार्श्वभूमी असून हा विनोदी अंगाने जाणारा चित्रपट असेल. चित्रपटाविषयी बोलताना माधुरी म्हणाली, चित्रपटाची कथा एका कुटुंबाभोवती गुंफण्यात आली असून त्यांचा अंधश्रद्धेवर असलेला विश्वास विनोदी पद्दतीने यात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना भरपूर हसवणारा असेल.
जयंत जठार या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या अगोदर जयंत जठार हे ‘कच्चा लिंबू’, ‘नटरंग’ आणि ‘फॅमिली कट्टा’ चित्रपटांशी जोडले गेले आहेत.