युके, 7 जुलै 2022: जे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात घडलं होतं, तेच आता ब्रिटनमध्ये घडत आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ज्या प्रकारे बंडखोरी त्यांच्याच पक्षात सुरू झाली होती, तशीच बंडखोरी बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षातही सुरू झालीय. आतापर्यंत चार कॅबिनेट मंत्र्यांसह 40 हून अधिक मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. आता अशा परिस्थितीत ज्या प्रकारे उद्धव ठाकरे सरकारवर संकट आलं होतं, तेच संकट बोरिस जॉन्सन यांच्या सरकारवर आलं आहे.
पण बोरिस जॉन्सन यांच्या सरकारवर हे संकट कसं आलं? त्याची सुरुवात अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांच्या राजीनाम्याने झाली. दोघांनीही 5 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास नसल्याचं त्यांनी सांगितलं.
ऋषी सुनक यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले होते की, सरकारने योग्य पद्धतीने काम करावं अशी लोकांची अपेक्षा आहे. त्याचवेळी साजिद जाविद म्हणाले होते की, सरकार देशहितासाठी काम करत नाही. बोरिस जॉन्सन यांची माफी मागितल्यानंतर दोघांनी हा राजीनामा दिलाय. मात्र, तरीही दोघेही सरकारमध्ये आहेत.
ऋषी सुनक आणि साजिद जाविद यांच्यानंतर आणखी एक कॅबिनेट मंत्री सायमन हार्ट यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्याशिवाय आणखी एक कॅबिनेट मंत्री ब्रँडन लुईस यांनीही राजीनामा दिलाय.
बंडखोरीनंतर बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. मात्र, असे असूनही जॉन्सन राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नाहीत. जॉन्सन म्हणतात की त्यांना मतदारांनी निवडलं आहे.
यूकेच्या राजकारणात पुढे काय? उद्धव ठाकरेंना वर्षा (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान) सोडावं लागलं त्याचप्रमाणे बोरिस जॉन्सन यांना 10 डाऊनिंग स्ट्रीट (पंतप्रधानांचं निवासस्थान) सोडावं लागेल का?
त्यामुळं मंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया थांबणार नसल्याचं मानलं जात आहे. अनेक मंत्री आणि खासदार ऋषी सुनक यांचा मार्ग अवलंबू शकतात. असं झालं तर जॉन्सन यांचा त्रास वाढू शकतो. कदाचित थेरेसा मे (माजी पंतप्रधान) यांना त्यांच्याच पक्षात मतदानाला सामोरं जावं लागलं तसे जॉन्सन यांना करावे लागेल. मात्र, थेरेसा मे यांनी मतदान जिंकलं.
पण राजीनामा कशासाठी? बंडखोरीचं कारण काय?
या संपूर्ण बंडाच्या केंद्रस्थानी ज्याचे नाव येत आहे ते म्हणजे ख्रिस पिंचर. ख्रिस पिंचरवर ‘सेक्स स्कँडल’चा आरोप आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये जॉन्सनने ख्रिस पिंचर यांना पक्षाचे उपमुख्य व्हीप म्हणून नियुक्त केले होते.
30 जून रोजी ‘द सन’ या ब्रिटीश वृत्तपत्राने एक अहवाल प्रकाशित केला होता, ज्यात दावा करण्यात आला होता की ख्रिस पिंचर यांनी लंडनच्या एका क्लबमध्ये दोन पुरुषांना आपत्ती जनक असा स्पर्श केला होता. हा अहवाल आल्यानंतर पिंचर यांना उपप्रमुख व्हीप पदाचा राजीनामा द्यावा लागला. पिंचर यांच्यावर यापूर्वी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाले आहेत.
वृत्तपत्राचा अहवाल समोर आल्यानंतर, त्यांच्या स्वतःच्या पक्षाने असा आरोप केला की जॉन्सन यांना पिंचर यांच्या आरोपांची माहिती होती, तरीही त्यांनी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. 1 जुलै रोजी सरकारच्या प्रवक्त्याने सांगितलं की पंतप्रधान जॉन्सन यांना आरोपांची माहिती नाही. परंतु पुन्हा 4 जुलै रोजी, सरकारी प्रवक्त्याने सांगितलं की जॉन्सन यांना आरोपांबद्दल माहिती आहे, परंतु आरोप सिद्ध न झाल्यामुळं पिंचर यांची नियुक्ती रोखणं योग्य मानलं नाही.
5 जुलै रोजी प्रथम ऋषी सुनक आणि काही काळानंतर साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात राजीनाम्यांचे पडसाद उमटले. 6 जुलै रोजी कॅबिनेट मंत्री सायमन हार्ट यांनीही राजीनामा दिला. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 4 कॅबिनेट मंत्री, 16 मंत्री, 21 खाजगी सचिव आणि इतर 5 जणांनी राजीनामा दिलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे