महामार्गाच्या कामातील ढिसाळ नियोजन ग्रामस्थांच्या जीवावर

दौंड, दि. ८ मे २०२०: दौंड कुरकुंभच्या दरम्यान सुरू असलेल्या बेंगरुळ मनमाड महामार्गाच्या कामातील ढिसाळ नियोजनाचा फटका परिसरातील ग्रामस्थांच्या जीवावर बेतत आहे. रस्ता रुंदीकरणाची प्रक्रीया सुरू करण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे खांब अधांतरी सोडून देण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातून वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा प्रामुख्याने त्रास होत असून लोकवस्तीत देखील याची दहशत आहे.

कुरकुंभ घाटाच्या परिसरात एका खांबाला जोराचा धक्का बसल्याने खांबाचा आधार तुटला त्यामुळे दोन तारांच्या घर्षणाने निर्माण झालेल्या आगीत एक महीला भाजली गेली. सध्या या महिलेवर दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. मात्र अश्या पद्धतीने बेजबाबदारपणे काम करण्यावर आजही निर्बंध टाकण्यात आलेले नाही.

रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी विजेचे खांब हटवणे बंधनकारक असताना देखील ते आजवर हटलेले नाहीत. जवळपास सर्वच ठिकाणी खांब धोकादायक पद्धतीने उभे आहेत. खांबा शेजारील जमीन पोखरल्याने खांबाचा पाया कमकुवत झाला असल्याने यामधून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुरकुंभ ते दौंड ह्या दहा किलोमीटर च्या अंतराच्या कामाला एका वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटुन गेला आहे मात्र आजपर्यंत मोठ्या प्रमाणात काम अर्धवट असल्याने वाहनांच्या अपघाताची संख्या देखील वाढत आहे. लॉक डाऊन च्या काळात काम करण्याची परवानगी असताना देखील कामाला गती देण्यात संबंधीत कंत्राटदार कमी पडत आहेत तर येणाऱ्या विविध अडचणी प्रशासन व नागरिकांच्या अडचणी पुढे करून वेळ काढुपणा केला जात आहे.

सुरुवातीपासूनच या कामाच्या बाबतीत विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत. या विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल यांनी अनेक वेळा याबाबत विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. मात्र यावर सकारात्मक कारवाईची प्रतीक्षा आजही सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा