अकोला, २३ फेब्रुवारी २०२४ : शहरातील अकोट स्टॅन्ड चौकात गांजाची तस्करी करणारा आरोपी रामदासपेठ पोलिसांनी लावलेल्या ‘ट्रॅप’मध्ये अडकला. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी तस्कराकडून तब्बल २८ किलो गांजा जप्त करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्यामुळे शहरात अंमली पदार्थाच्या विक्रीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
शहरातील अकोट स्टॅन्ड परिसरात बुधवारी रात्री एक इसम दोन पांढऱ्या बॅगमध्ये गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती रामदास पेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज बहुरे यांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिस यंत्रणेने अलर्ट होत या परिसरात सापळा रचला. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी लावलेल्या जाळ्यात आरोपी शेख इकाम शेख रशिद (३०) अमरावती येथे अडकला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करण्याच्या आत उपस्थित पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या ताब्यातून दोन पांढऱ्या बॅगमधील ४ लक्ष २२ हजार ८९५ रुपयांचा तब्बल २८ किलो १९३ ग्रॅम गांजा जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार, प्रदिप जोगदंड, सदाशिव सुळकर, शेख हसन शेख अब्दुल्ला, किरण गवई, विजय सावदेकर, तोहीदअली काझी, शाम मोहळे, आकाश जामोदे, अतुल बावने, शिवाजी धोत्रे, संतोष सुराशे, पुजा येंदे, माधुरी लाहोळे यांनी केली.
न्युज अनकट प्रतिनीधी : शाहिद इकबाल