IND vs ENG, 28 जून 2022: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी संघाची घोषणा केलीय. 15 सदस्यीय संघाचे कर्णधारपद बेन स्टोक्सच्या खांद्यावर असेल. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनलाही संघात स्थान मिळालं आहे, जो न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत सहभागी होऊ शकला नाही.
> पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रुक, जॅक क्राउली, बेन फॉक्स, जॅक लीच, अॅलेक्स लीज, क्रेग ओव्हरटन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, मॅटी पॉट्स , जो रूट.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील हा पाचवा कसोटी सामना 1 ते 5 जुलै दरम्यान एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. गेल्या वर्षी चार कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघात कोरोनाचे रुग्ण आढळले होते, त्यानंतर हा पाचवा सामना पुढं ढकलण्यात आला होता.
इंग्लंडचा उत्साह उंचावला
सोमवारीच न्यूझीलंडविरुद्धची तिसरी कसोटी जिंकून इंग्लंडने किवींचा 3-0 असा पराभव केला होता. अशा स्थितीत भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी इंग्लंडचा उत्साह खूप उंचावलाय. आता नवीन प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघ आक्रमक क्रिकेट खेळत आहे.
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वीच ईसीबीने ब्रेंडन मॅक्क्युलमची कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्याचवेळी जो रूटने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्सला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. दोघांनी आता काही महिन्यांत संघाचं नशीब बदललं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे